खास बात
दीपक शिकारपूर
अलिकडे गोंधळ माजवणाऱ्या, जगाचे लक्ष वेधणाऱ्या आणि मोठी हानी पोहोचवणाऱ्या ‘पेजर बॉम्ब’च्या निमित्ताने युद्धाचे वेगळे आणि हायटेक स्वरुप समोर आले. या माध्यमातून लेबनॉनमध्ये अनेक पेजरमध्ये स्फोट झाले. यामुळे मोठी जीवितहानी झाली. या घटनेनंतर जगभरात खळबळ उडणे स्वाभाविक होते. या स्फोटांमागे कोण होते आणि हे कसे शक्य झाले, याचा शोध घेताना अनेक दखलपात्र बाबी समोर आल्या आहेत.
गेल्या पाच-पंचवीस वर्षांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील आर्थिक-सामाजिक-राजकीय चित्रे, धोरणे आणि समीकरणे आरपार बदलली. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि उपग्रहीय संवादमाध्यमांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यातही सूक्ष्म तंत्रज्ञान (नॅनो टेक्नॉलॉजी), सर्व संगणकीय वैशिष्ट्ये समाविष्ट असणारा सेलफोन आणि इंटरनेट यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातल्या माणसांचे जीवनचित्र पूर्णतः वेगळे झाले आहे. (काहींचे झाले नसले तर लवकरच होईल!) दळणवळण, वैद्यकशास्त्र अशा काही क्षेत्रांचे रूप तर इतके पालटले आहे की केवळ 30 वर्षांपूर्वीच्या या विषयांमधील तज्ज्ञ व्यक्तीलाही आता गोंधळल्यासारखे होत असेल. याच प्रकारे धोरणांचा आणि साधनांचा मोठ्या प्रमाणात कायापालट झालेले आणखी एक क्षेत्र म्हणजे युद्ध, युद्धनीती आणि युद्धसाहित्य हे आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आजच्या सैनिकाचे आणि युद्धतंत्राचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे. आत्तापर्यंत युद्ध म्हटले की शत्रूशी प्रत्यक्ष दोन हात करणारे भूदल-नौदल-हवाई दल आणि त्यातील वीर जवान, त्यांना आदेश देणारी लष्करी कार्यालये अर्थात ‘हायकमांड’ अशी दोनच टोके सर्वसामान्य व्यक्तीच्या डोळ्यासमोर तरळत होती. मात्र बदलत्या काळात हे स्वरूप अत्यंत वेगाने बदलत आहे. आता सर्व गोष्टी स्मार्ट आणि हाय टेक होत आहेत. सध्याच्या संगणकीय प्रणाली इतक्या गुंतागुंतीच्या असतात की त्यांच्या अगदी अंतर्भागात म्हणजेच ‘कोअर’मध्ये कुठे तरी दडून बसलेला विषाणू ओळखून काढणे जवळजवळ अशक्य असते. त्याने स्वतः काही हालचाल करून थोडक्यात काही तरी ‘प्रताप’ दाखवून आपल्या अस्तित्वाची जाणीव बाहेरच्या जगाला करून देईपर्यंत हे एक गुपीतच राहते. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय करेपर्यंत संबंधितांचे बरेच नुकसान झालेले असते.
अलिकडे गोंधळ माजवणाऱ्या, जगाचे लक्ष वेधणाऱ्या आणि मोठी हानी पोहोचवणाऱ्या ‘पेजर बॉम्ब’च्या निमित्ताने युद्धाचे हे वेगळे आणि आधी उल्लेख केल्याप्रमाणे हायटेक स्वरुप समोर आले आहे. अलिकडेच लेबनॉनमध्ये अनेक पेजरमध्ये, वॉकीटॉकीमध्ये स्फोट झाले. यामुळे मोठी जीवित हानी झाली. या घटनेनंतर जगभरात खळबळ उडणे स्वाभाविक होते. या स्फोटांमागे कोण होते आणि हे कसे शक्य झाले, याचा शोध घेताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सायबर हल्ल्याचे दोन प्रकार आपण समजून घ्यायला हवेत. एक म्हणजे वेबसाईटवर हल्ले करुन माहितीची चोरी करायची आणि त्याचा गैरवापर करायचा हा एक भाग झाला. दुसरा भाग इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचा वापर करुन केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांचा आहे. अलिकडची घटना त्याचाच एक भाग आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या पेजरच्या बॅटरीमधील एका सूक्ष्म चिपमध्ये स्फोटक द्रव्य भरले गेले होते. हे काम इतके सूक्ष्मपणे केले गेले होते की ते कोणत्याही उपकरणाने शोधणे अशक्य होते. नंतर मोबाईलद्वारे त्या चीपचे तापमान वाढवले गेले आणि त्यातूनच स्फोट झाले. मोबाईमध्ये ट्रॅकग सिस्टीम कार्यरत असते. त्यामुळेच आपला फोन ट्रॅक होत असतो. मात्र 30 वर्षांपूर्वी वापरात असणाऱ्या पेजर टेक्नॉलॉजीमध्ये ही ट्रॅकग सिस्टीम नव्हती.
वाचकांमधील काहींनी पेजर वापरलेही असतील. त्यांना ठाऊक असेल की यात एका मध्यवर्ती केंद्राकडून फक्त मेसेज यायचे. आपण त्याला उत्तर पाठवू शकायचो नाही. म्हणजेच हे संपर्काचे वन वे माध्यम होते. पण मोबाईलच्या उदयापूर्वीचे असल्यामुळे त्याचे अप्रुपही होते आणि व्यावसायिकांना त्या काळी याची मोठी मदतही झाली आहे. अन्य कोणतीही कृत्रिम बुद्धिमत्ता वा अन्य बाबी नसल्या तरी अडीअडचणीच्या वेळी मिळणाऱ्या या संदेशानेही बरेच काम साधले जायचे. लेबनॉनमधील दहशतवादी हेच जुने तंत्रज्ञान वापरत होते. या माध्यमातून त्यांना संदेश प्राप्त व्हायचे आणि पेजर वापरल्यामुळे ट्रॅक करणे शक्य नव्हते. मात्र पेजरसाठी लागणाऱ्या बॅटरी काही लेबनॉनमध्ये बनत नाहीत. त्या युरोप वा इतर भागातून आयात केल्या आणि बसवल्या जायच्या. असे असताना इस्त्रायलने अधिकृतरित्या जबाबदारी घेतलेली नसली तरी असे म्हणतात की, त्यांनी बॅटरी उत्पादित करणाऱ्या कंपन्यांशी संगनमत करुन एक सूक्ष्म चीप टाकली. बॅटरीच्या आतमध्ये असल्यामुळे बाहेर कुठूनही ती दिसण्याचा संबंध नव्हता. अशा प्रकारे चीपसह उत्पादित केलेल्या हजारो बॅटऱ्या त्यांनी वितरीत केल्या. या चीप कोणत्याही क्ष किरण तपासणी वा त्यासारख्या स्कॅनग मशीनमध्ये न दिसणाऱ्या, डिटेक्ट न होणाऱ्या होत्या. त्यामुळे कोणालाही त्याचा साधा संशयही येऊ शकला नाही. ही चीप आयओटीला संलग्न होती. म्हणजेच या नंबरला संदेश पाठवला की चीपमध्ये मोठा स्फोट घडू शकतो. याच प्रकारे पेजरमध्ये स्फोट घडवले गेल्याचे काहींचे म्हणणे आहे. अर्थातच या घटनेमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
अशाच प्रकारे ड्रोन्सच्या माध्यमातून हल्ले होत असल्याचे आपण जाणतो. पूर्वी सुसाईड बॉम्बर हे काम करायचे. स्वत:च्या शरीराला स्फोटके गुंडाळून मोठा घातपात घडवून आणल्याची आणि त्यात अनेकांचा जीव गेल्याची उदाहरणे आपण पाहिली वा अनुभवली आहेत. आता मात्र त्याची गरज राहिलेली नाही, कारण ड्रोनच्या माध्यमातून स्फोटके पाठवून दूरवरील ठिकाणाहून नियंत्रित करत हव्या त्या जागी स्फोट घडवून आणणे शक्य झाले आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात रशियाकडून अनेकदा या तंत्राचा वापर करुन मोठी हानी घडवून आणण्यात आली आहे. 29/11 च्या हल्ल्यामध्ये विमानाचा वापर केला गेला. मात्र आता ड्रायव्हरविना विमाने उडवून हे परिणाम प्रत्यक्षात आणणे शक्य आहे. त्यासाठी पायलटकडून विमान उडवले जाणे गरजेचे राहिलेले नाही. पायलटविना प्रवास करणाऱ्या विमानात ठेवलेल्या क्षेपणास्त्रांना गाईडलाईन दिली की अपेक्षित भागात विद्ध्वंस घडवता येऊ शकतो. यावरुन लक्षात येते की ही दुर्दैवाची बाब असली तरी अनेक विघातक कारवायांसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे.
समजा, एखादा दहशतवादी अशी एखादी सूक्ष्म चीप असणारा मोबाईल घेऊन विमानात गेला आणि रिमोटने स्फोट घडवून आणला गेला तर संपूर्ण विमान कोसळून मोठी जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. आज आपण मोबाईल विमानात नेतो. तो सुरू करता येत नाही इतकेच. पण चीपवाला मोबाईल असेल तर सुरू करणे वा न करणे हा प्रश्नच राहणार नाही. बाहेरुन अपेक्षित परिणाम मिळवणे विघातक शक्तीना सहजशक्य होईल. असे अनेक मुद्दे, धोके भविष्यात समोर येऊ शकतात. शेवटी कोणतेही तंत्रज्ञान विधायक आणि विघातक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. त्यात संबंधित कसे डोके लावतात आणि कसा वापर करतात, यावर सगळे काही अवलंबून आहे. त्यातच गुन्हेगार तंत्रज्ञानाचा कोणत्या प्रकारे आणि कोणत्या पातळीवर विनाशासाठी वापर करतील याचा तुम्ही विचार करु शकत नाही. त्यामुळेच तंत्रज्ञान विकसित होत असताना गैरवापर करण्याचे मोठे आव्हान कायमच जगापुढे असणार आहे. आताचे उदाहरण घ्यायचे तर 30 वर्षांपुर्वीचे तंत्रज्ञान कोणी वापरेल याचा विचारही केला गेला नसेल. 1998 मध्ये पेजरची विक्रीही बंद झाली होती. असे असूनही त्याचा वापर झालेला दिसला. ही एक घटना बरेच काही शिकवून जाणारी आहे.
यापुढे सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होण्याची शक्यता आहे. आत असणारी सूक्ष्मातील सूक्ष्म चीपही निदर्शनास येईल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच सायबर वॉरचा, त्यातील धोक्याचाच नव्याने आणि सातत्याने विचार होण्याची गरज लक्षात घ्यावी लागेल, कारण सध्या हेच नव्हे तर यासारखे अनेक धोके समोर येत आहेत. बटरफ्लाय ड्रोन हे असेच एक उदाहरण म्हणता येईल. हा ड्रोन एखाद्या फुलपाखराइतका लहान असतो आणि तसाच दिसतो. दुर्दैवाने आता त्याचा वापर सायबर वॉरपुरता राहिला नसून कॉर्पोरेट क्षेत्रातही होत आहे. जसे की एखाद्याच्या केबिनमध्ये वा कॉन्फरन्स रुममध्ये हे ड्रोनरुपी छोटेसे फुलपाखरु आल्याचे कोणाला कळतही नाही. पण हा ड्रोन व्हिडिओ घेत सगळे काही रेकॉर्ड करतो आणि निघून जातो. हे सगळे सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहणार आहे. तेव्हा संरक्षण यंत्रणा अधिकाधिक सक्षम, अभेद्य करण्याखेरीज दुसरा उपाय नाही.
(अद्वैत फीचर्स)
