स्थानिकांची मागणी

माथेरान : माथेरान या पर्यटनस्थळाला २००३ मध्ये इको सेन्सेटिव्ह झोन लागू केल्यापासून आवश्यक असणाऱ्या महत्वाकांक्षी विकास कामांना परवानगी घेण्यासाठी शासनाने नेमलेल्या सनियंत्रण समितीच्या परवानगी शिवाय आणि त्यांच्या जाचक अटींमुळे काहीही करता येत नसल्याने एकप्रकारे माथेरानच्या विकासाला जे काही अडसर निर्माण होत आहेत ते शासनाने दूर करावेत अशी मागणी होत आहे.

हेरिटेज वास्तूंच्या डागडुजी असोत किंवा रहदारीच्या दगड मातीच्या रस्त्यांचा प्रश्न असो

या सनियंत्रण आणि हेरिटेज समितीच्या परवानगी शिवाय कामे पूर्ण करता येत नाहीत.इको सेन्सेटिव्ह झोन लागू असल्याने सनियंत्रण समितीचे पदाधिकारी मुळात इथे वास्तव्यास नसताना या गावाविषयी त्यांनाच अधिक प्रेम असल्याचा अविर्भाव आणून विकास कामांना आडकाठी आणली जात आहे.त्यामुळेच येथील रस्त्यांची  अद्यापही दुरुस्ती होऊ शकलेली नाही.त्यातच या गावात पूर्वीपासून विकासाला विरोध करणारी मंडळी आजही कार्यरत असल्याने लहान सहान बाबींची इत्यंभूत माहिती एखाद्या खबऱ्यां प्रमाणे नियमितपणे सनियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली जाते असेही बोलले जात आहे. एकीकडे जग एकविसाव्या शतकात वाटचाल करीत असताना याठिकाणी जुन्याच विचारांना, व्यवसायांना स्थान देण्यात धन्यता मानणाऱ्या लोकांमुळे हे गाव प्रगती पथावर जाऊ शकलेले नाही.आणि अशाच विघातक मंडळींना काही स्वार्थी राजकीय पक्षांची मंडळी मतांच्या हव्यासापोटी खतपाणी घालत आहेत.मुळात ज्या गावातील रस्ते सुस्थितीत नाहीत त्या गावाचा विकास कदापी होऊ शकत नाही हे जरी त्रिवार सत्य असले तरीसुध्दा आजच्या कमाईवरच खुश होऊन भविष्याची आपल्या भावी पिढीची चिंता नसणाऱ्या इथल्या काही मंडळींमुळे या गावाचा विकास होण्यास विलंब लागत आहे. अनेक ठिकाणी हॉटेल त्याचप्रमाणे बंगल्याच्या रहदारीच्या मार्गावर रस्ते आहेत की एखाद्या खडकाळ प्रदेशात आलो आहोत असा भास होत असतो. आगामी काळात पर्यटकांना ने आण करण्यासाठी ई रिक्षा सर्वत्र सेवा उपलब्ध करुन देणार आहेत त्यासाठी आवश्यक ठिकाणी उत्तम दर्जाचे क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांशिवाय पर्याय उरलेला नाही.अन्यथा पुर्वीच्या दगड मातीच्या रस्त्यांची पावसाळ्यात धूप होऊन सर्वत्र खड्डेमय रस्ते निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेही बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *