गरजू व प्रतिभावान विद्यार्थांनी लाभ घ्यावा- सनी विनायक निम्हण यांचे आवाहन
पुणे,ता.४: दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या व्दितीय स्मृतिदिनानिमित्त ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ तर्फे पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना ‘विनायकी’ विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पुणे शहरातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असून याची नोंदणी www.sunnynimhan.com या संकेस्थळावर १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सुरू आहे.
संकेतस्थळावर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची दि १८, १९, २० ऑक्टोबर २०२४ ला, सोमेश्वर फाऊंडेशन कार्यालय, ४४८, गोपी भवन, शैलेजा हॅाटेल लेन, शिवाजीनगर, पुणे- ५ येथे प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थांना दि २६ ऑक्टोबर २०२४ ला, बालगंधर्व रंगमंदिर , जंगली महाराज रोड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शिष्यवृत्तीचे वाटप केले जाईल.
मागील वर्षी या गौरव शिष्यवृत्तीद्वारे ३६८ गरजू व प्रतिभावान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली होती. यावर्षी देखील अशा गरजू व प्रतिभावान विद्यार्थ्यांना संधी देत आहोत. इयत्ता पाचवी व आठवी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या आणि काहीच गुण कमी पडल्यामुळे शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उमेद न सोडता प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक व्हावे यासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येते. डिप्लोमा, आयटीआय तसेच आर्टस, सायन्स, कॉमर्स, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, कृषी, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ, जर्नालिझम इत्यादी शाखांतील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक निकष, नियम व अटीची पुर्तता करून गौरव शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
“माणसाला उत्तम आरोग्य आणि शिक्षण मिळाले तर, कोणत्याही संकटावर पाय रोवून उभं राहण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण होते” असा विचार मांडणारे दिवंगत आमदार विनायक निम्हण यांनी आरोग्य आणि शिक्षणाला विशेष महत्त्व दिले. सोमेश्वर फाऊंडेशनच्या माध्यमातून कला, क्रिडा, साहित्य, शैणक्षिक असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी विषयक व्याख्यानमाला, गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ तसेच करियर मार्गदर्शन असे उपक्रम आयोजित करण्यात येतात. दरवर्षी नियमितपणे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपही करण्यात येते. १९९९ पासून ‘नो डोनेशन.. नो डिपॉझिट तत्वावर ‘सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल’, ज्युनिअर कॉलेज कोथरूड, पाषाण ही संस्था उभी करून अनेक विद्यार्थी घडवले. यासह त्यांनी, सामाजिक कार्य व्यापक स्वरूपात करण्यासाठी ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ची स्थापना केली.
आरोग्य क्षेत्रातही सोमेश्वर फाऊंडेशन मागील अनेक वर्षेपासून उत्तम काम करत आहे. त्यामध्ये मागील दोन वर्षात पुण्यात ‘कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबीर, एकच ग्वाही – तपासणीपासून शस्रक्रियेपर्यंत मोफत सर्वकाही, असे भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यात दोन्ही वर्षाचे शिबिर मिळून जवळपास सव्वा लाख रुग्णांनी सहभाग घेतला होता. या शिबीरात जगविख्यात डॉक्टरांकडून उपचार तसेच विविध तपासण्या, चाचण्या आणि अगदी मोठ्या शस्त्रक्रियाही मोफत करण्यात आल्या. गरजू रुग्णांना या महा-आरोग्य शिबीराचा मोठा लाभ झाला आहे. सदर माहिती सोमेश्वर फाऊंडेशनचे सनी विनायक निम्हण यानी दिली. यावेळी फाऊंडेशनचे बिपीन मोदी, उमेश वाघ, अमित मुरकुटे, अनिकेत कपोते उपस्थित होते.
00000