Photo-1
सव्वा वर्षात १५ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास
सायकलिंग मधील हाफ एवरेस्टींग पूर्ण
योगेश चांदेकर
पालघरः ‘तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच भरत राहो! वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो!’ सुरेश भट यांच्या कवितेच्या या ओळी. तरुण म्हणजे किती वयाचा असे विचारले जात असले, तरी तारुण्य हे वयावर नाही, तर मनावर अवलंबून असते, हे अनेकांनी आपल्या कृतीतून वारंवार दाखवून दिले आहे. पालघर तालुक्यातील बोईसर येथील रामदास तातोबा जाधव या ५२ वर्षाच्या ‘युवका’ने चप्पल न घालता सायकलवर महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर गाठून एक नवा पराक्रम नोंदवला आहे. सव्वा वर्षात त्यांनी पंधरा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला असून सायकलिंग मधील हाफ एवरेस्टींग पूर्ण केले आहे.
तरुणपण आणि वार्धक्य हे शारीरिकदृष्ट्या वेगवेगळे असले, तरी ते जसे शरीराशी संबंधित आहे, तसे ते मनाशी संबंधित आहे. सजीवसृष्टीतील प्रत्येक वनस्पती आणि प्राण्यांच्या आयुष्यात फुलण्याचे दिवस अगदी थोडेच असतात. वनस्पतींना कळ्या येऊन फुले येऊ लागली, की त्यांच्या आयुष्यातल्या भरणीचे दिवस सुरू होतात. मानवाच्या आयुष्यातले तारुण्याचे दिवस म्हणजे आयुष्यरुपी वृक्षाला सुंदर फुलांनी मोहरलेला बहर असतो. फुललेले रोपटे असो किंवा एखादा वृक्ष; तो जसा आजूबाजूचे परिसरातल्या इतर सजीवांना आकर्षित करतो, तसेच तारुण्यातली सतेज कांती, प्रफुल्ल चेहरा चालण्या- बोलण्यातला रुबाबदारपणा असे तरुण व्यक्तीचे व्यक्तिमत्व सर्वांना भुरळ पाडत असते.
अवघ्या ५२ मध्येही यौवनात मी!
फुले जशी लवकर कोमेजतात तसेच तारुण्याचे दिवस झर्रकन निघून जातात. फुलासारखे तारुण्यही कोमेजू लागते, हा निसर्ग नियम असला, तरी माणसाच्या बाबतीत मात्र शरीर तारुण्य आणि मन याचा परस्परांशी अन्योन्य संबंध आहे. मनुष्याला आपल्या आयुष्याकडे सकारात्मकतेने पुढे बघण्याची, विचार करण्याची बुद्धी आहे; मात्र बहुतेक माणसांची विचार करण्याची बुद्धी नकारात्मक होते. आता माझे वय झाले. तारुण्य संपले असे रडगाणे अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात गात असतात. वयोमानानुसार शरीर थकलेले असले, तरी विचार करण्याची बुद्धी नकारात्मक असेल, तर मात्र खऱ्या अर्थाने माणूस वृद्ध होतो. रामदास जाधव मात्र त्याला अपवाद आहेत.
छंद हा लागे जिवा, सायकलचा ठेवा!
आयुष्यात सकारात्मक विचार असले, तर आपले मन चिरतरुण ठेवता येते. त्यामुळे विचारपुष्प कधीच थांबत नाही. त्याचा सुगंध वर्षानुवर्षे दरवळत राहतो. शरीराने वयस्कर असले आणि विचार आणि मनाने तरुण असणारे वृद्ध हे आयुष्याचा खऱ्या अर्थाने आनंद घेतात आणि त्यांचे विचार तारुण्यातील सगळ्यांना आकर्षित करतात. अशी माणसे सर्वांना हवीहवीशी असतात आणि ते इतरांना आपल्या जगण्यातून नवी दिशा देत असतात. इतरांच्या आयुष्यात नवनवीन पालवी फुटायला मदत करत असतात. जाधव हे असेच व्यक्तिमत्व आहे. कुणाला गिर्यारोहणाचा, कुणाला मोटरसायकलवर भटकण्याचा, कुणाला चित्रे जमवण्याचा, कुणाला सह्या गोळा करण्याचा तर कुणाला अन्य काहीही छंद असतो. रामदास जाधव यांनाही असाच एक छंद आहे; परंतु तो आगळा वेगळा आहे.
अडचणी तुला पामराला!
लोक पायी डोंगरकपाऱ्या पार करत असतात; परंतु जाधव मात्र सायकलवरून मोठमोठी शिखरे गाठत असतात. कोरोनाच्या काळात डहाणू आणि पालघर तालुक्यातील हौशी सायकलस्वारांनी एकत्र येऊन ‘बोईसर फ्लायर्स ग्रुप’ची स्थापना केली. रामदास जाधव या ग्रुपचे सदस्य असून गेल्या सव्वा वर्षात त्यांनी सायकल मोहिमात भाग घेतला. सव्वा वर्षात त्यांनी पंधरा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास केला आहे. सायकलवरील प्रेमापोटीच त्यांनी कळसुबाई शिखरावर सायकलने पोहोचण्याचा निर्धार केला. केवळ निर्धार करून ते स्वस्थ बसले नाहीत, तर १६४६ मीटर उंचीचे कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर त्यांनी सायकलवर गाठले. त्यासाठी बोईसर मधील दुर्गअसावा ते श्री क्षेत्र कळसूबाई असा सायकल प्रवास व श्री क्षेत्र कळसुबाई पायथ्यापासून शिखरावर त्यांनी खांद्यावर सायकल उचलून त्यांनी असा प्रवास केला. ऑगस्टमध्ये अन्य भाविक, गिर्यारोहक आणि पर्यटकांची गर्दी असल्याने लोखंडी शिडीवरून सायकल नेताना त्यांना त्रास झाला; परंतु त्यावर त्यांनी मात केली.
आता लक्ष्य एव्हरेस्ट
मागील काही वर्षात एव्हरेस्ट मोहिमा विशेष लोकप्रिय होत आहेत. जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टचे ८८४८ मीटर उंचीची चढाई करणे हे सोपे काम नाही; परंतु जाधव यांनी आतापर्यंत २२१२ मीटर उंचीएवढी चढाई एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल सात वेळा पूर्ण केली आहे. याचा अर्थ त्यांनी एव्हरेस्ट एवढ्या उंचीचे शिखर अनेकदा सायकलवारीने गाठले. ही मोहीम राबवताना दीड-दोन तासापेक्षा अधिक विश्रांती न घेता सलग कामगिरी पूर्ण करावी लागते. ही राईड ‘स्ट्रॉवा ॲप’ वर नोंदवून एव्हरेस्टिंग वेबसाईटवर खाते बनवून अपलोड करावे लागते. ‘हॉल ऑफ फेम एव्हरेस्टिंग’ मध्ये सायकलस्वार,देशाचे नाव व राईटचे सेगमेंट लिहावे लागते. त्यात सात वेळा रामदास जाधव यांचे व देशाचे नाव झळकले आहे. यापुढे सायकलिंग मधील फुलएवरेस्टींग हा क्रीडा प्रकार करण्याचा त्यांचा मानस आहे. एलिवेशन म्हणजे जगातील कोणत्याही टेकडीवर एकाच दिशेने सतत वर खाली फेऱ्या मारणे. अशा प्रकारचे आव्हान रामदास जाधव यांनी स्वीकारले असून त्यांनी पालघर मधील वाघोबा घाट पहाटे ४ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत असा एक दिवसात ५६ वेळा चढ उतार करण्याचा पराक्रम केला आहे.
