१०० कोटींचा निधी मंजूर-प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर / अरविंद जोशी

भाईंदर : ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचे जतन – संवर्धन होण्याच्या दृष्टीने काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे.  घोडबंदर  खाडी किनारा विकासाचे कामही लवकरच सुरु होत आहे. याच शेजारी असलेल्या जागेत भव्य ‘शिवसृष्टी’चे कामही मंजूर झाले आहे. त्याजवळ हा खाडी किनारा विकास सुरु होणार असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार आहेत.  आता वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटच्या दुसऱ्या टप्प्यात, मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर खाडी किनारा व घोडबंदर किल्ल्याला जोडणाऱ्या स्काय वॉक तयार करण्यासाठी १०० कोटींच्या कामास निधीसह राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे.जवळपास १ किलोमीटर लांबीचा हा ग्लास स्काय वॉक असेल. हा तयार होणारा ग्लास स्कायवॉक आकर्षक डिझाईनचा असणार असून फक्त मीरा भाईंदरच नाही तर मुंबई महानगरातील पर्यटकांच्या पसंतीस तो उतरेल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

पहिल्या टप्प्यात घोडबंदर खाडी किनारा विकास म्हणजेच वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटचे काम आता सुरु होत आहे. दुसऱ्या टप्प्यात येथे खाडी किनाऱ्यावरून थेट किल्ल्यात , शिवसृष्टीला जोडणारा स्काय वॉक असावा अशी संकल्पना आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली. त्याला राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने निधीसह मंजुरी दिली आहे.  घोडबंदर येथे खाडी किनारा विकासाचे काम जिथे पूर्ण होईल त्या खाडी किनाऱ्यापासून तिथपासून घोडबंदर किल्ला वरील भागात म्हणजे उंचावर आहे. खाडी किनाऱ्यावरून उंचावरील किल्ल्यात व पुढे तयार होणाऱ्या शिवसृष्टीत जाण्यासाठी एक आकर्षक स्काय वॉक तयार करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे. या स्काय वॉकचा बराचसा भाग हा पारदर्शक काचेचा असणार आहे. ‘ग्लास स्कायवॉक’ किंवा ‘ग्लास ब्रिज’ म्हणून त्याची ओळख होईल. जे पर्यटक खाडी किनाऱ्यावर फिरण्यासाठी येतील त्यांना थेट किल्ल्यात किंवा शिवसृष्टीत जाण्यासाठी हा काचेचा स्कायवॉक मदत करेल. जवळपास १ किलोमीटर लांबीचा हा स्काय वॉक असेल. खाडी किनाऱ्यावरून जाणारा हा स्कायवॉक म्हणजे पाण्याच्या वरून जाण्याचा अनुभव पर्यटकांना घेता येईल. त्यात काचेचा स्काय वॉक असल्याने त्याचे विशेष आकर्षण अधिक वाढेल. या स्काय वॉकचे संकल्पचित्र बनवले जात असून आकर्षक आगळेवेगळे व लक्षवेधी असे ग्लास स्कायवॉक चे डिजाईन असेल. शिवाय या काचेच्या स्काय वॉकवरून आजूबाजूच्या परिसराची दृश्ये पाहता व टिपता यावीत यासाठी ‘व्यूइंग डेक’ तयार करण्याचाही आमदार सरनाईक यांचा विचार आहे. घोडबंदर खाडी किनारा ते किल्ला – शिवसृष्टी असे दोन पॉईंट या स्काय वॉकने जोडले जातील.घोडबंदर खाडी किनारा ते घोडबंदर किल्ला साधारणतः ४५० मीटर लांबीचा स्काय वॉक असेल तर तिथून पुढे शिवसृष्टीपर्यंत जोडण्यासाठी ५०० मीटर असा जवळपास १ किलोमीटर लांबीचा हा ग्लास स्कायवॉक असणार आहे. स्काय वॉक बरोबर परिसर सुशोभीकरणही केले जाईल , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *