प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्का मिथुन चक्रवर्तीयांना जाहिर झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन. एका संघर्षाचा हा सन्मान असल्याचे आम्ही मानतो. बॉलीवूडच्या सुपरस्टार्समध्ये गणले जाणारे मिथुन संघर्षाच्या काळात अनेक रात्री मोकळ्या आकाशाखाली उपाशी झोपले. अविरत परिश्रमांनंतर त्यांच्या वाट्याला पुढे अनेक सन्मान आले. मिथुन यांनी स्वतःच्या अडचणींची कहाणी अनेकदा सांगितली आहे. एकदा ते म्हणाले होते, आयुष्यात मी जे काही भोगले, ते इतरांना भोगावे लागू नये. संघर्षाच्या दिवसांमध्ये मिथुन यांनी अनेक रात्री मुंबईच्या फूटपाथवर जागून काढल्या. बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्वचेच्या रंगामुळे त्यांना खूप भेदभावाला सामोरे जावे लागले होते. टॉप अभिनेत्री त्यांच्यासोबत चित्रपट करण्यास नकार देत होत्या. अनेक वर्षे त्यांना हे सहन करावे लागले. लोकांचे लक्ष वळवण्यासाठी त्यांनी अनोख्या ‘डान्स मूव्हज’वर काम केले. झीनत अमान या पहिली अभिनेत्री, ज्यांनी मिथुनदांची प्रशंसा केली आणि त्यांच्या ‘लूक’चे चांगले वर्णन केले. एका ठिकाणी ते म्हणाले होते, की मला पाहून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि चाळीत किंवा गावात राहूनही आपला मुलगा अभिनेता होऊ शकतो, असे त्यांना वाटू लागले. मी आता सामान्य माणसाचा ‘हीरो’ झालो होतो. सामान्य माणसातून सुपरस्टार बनणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मला वाटले की, मी नाचलो, तर माझा रंग दुय्यम ठरतो आणि तेच झाले. नृत्यामुळे लोक माझा रंग विसरले. माझ्यासारख्या वर्णाच्या नायकाची कल्पनाही कोणी केली नव्हती.’ एक काळ असा होता की ते बी-ग्रेड चित्रपटांमधून ए-ग्रेड चित्रपटांकडे जाऊ शकणार नाहीत, असे अनेकांना वाटत होते. ‘तकदीर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे ते ‘ए’ श्रेणीचा अभिनेता झाले. मिथुन यांच्या त्या चित्रपटाने त्यावेळी शंभर कोटी रुपयांची कमाई केली होती. पुढे मिथुन हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दमदार अभिनेता बनले. मिथुन यांनी आतापर्यंत सुमारे साडेतीनशे चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक प्रदीर्घ खेळी खेळणाऱ्या अभिनेत्यांपैकी ते एक मानले जातात.८० च्या दशकात मिथुन यांचे चित्रपट मोठ्या पडद्यावर कमाल दाखवत नव्हते. त्या वेळी ते ‘तकदीर के बादशाह’ या चित्रपटाचे चित्रिकरण करत होते. कारकीर्दीतील अपयशाने ते त्रस्त आणि निराश झाले होते. दिग्दर्शक सुभाष यांनी त्याबाबत विचारले तेव्हा ते म्हणाले की एवढी मेहनत करूनही मी काही साध्य करू शकत नाही.’ त्यानंतर त्यांना ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाची ऑफर मिळाली आणि या चित्रपटाने मिथुन रातोरात स्टार बनले. ही त्या काळातली मोठी गोष्ट होती. मिथुन एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच बिझनेस आणि राजकारणातही स्टारपेक्षा कमी नव्हते. त्यांचा हॉटेलचा मोठा व्यवसाय आहे. उटीमध्ये त्यांचे सर्वात मोठे हॉटेल आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी चित्रपट, व्यवसाय आणि इतर व्यवसायांमधून सुमारे चारशे कोटी रुपयांची संपत्ती कमावली आहे.
मिथुन चक्रवर्ती यांना ‘मृगया’ या पदार्पणातील चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय त्यांना १९९३ मध्ये ‘ताहदर कथा’ या चित्रपटासाठी दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एप्रिल २०२४ मध्ये त्यांना पद्मभूषण सन्मान देण्यात आला. मिथुन यांच्या चर्चीत चित्रपटांमध्ये डिस्को डान्सर, प्यार झुकता नहीं, स्वर्ग से सुंदर, हम पांच, साहस, वारदात, बॉक्सर, प्यारी बेहना, प्रेम प्रतिज्ञा, मुजरिम यांचा समावेश आहे. अग्निपथ, द कश्मीर फाइल्स आणि द ताश्कंद फाइल्स सारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. आता भारत सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. हा पुरस्कार चित्रपटक्षेत्रातील योगदानाबद्दल सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. पश्चिम बंगालमधून आलेल्या अभिनेत्यांमध्ये मिथुन चक्रवर्ती हे एकमेव नाव आहे, ज्यांनी उत्तर भारतातही प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांनी हिंदी, बंगाली, भोजपुरी, उडिया, तेलगू आणि तामिळ भाषेतील 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मृणाल सेनच्या मृगया (1976), सुरक्षा (1979), बिमल दत्त यांच्या कस्तुरी (1980), आणि ख्वाजा अहमद अब्बासच्या द नक्सलाइट्स यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी स्वत: ला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून स्थापित केले.
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळण्यालाही मोठा राजकीय अर्थ आहे. त्यांची राजकारणातील सक्रियता गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. त्यांनी 2013 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी त्यांना राज्यसभा खासदार केले; परंतु मिथुन यांनी राजकारणातून मध्यंतरी ब्रेक घेतला. ते तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आले. पश्चिम बंगालमध्ये 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मिथुन चक्रवर्ती यांना सोबत आणण्यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी मार्च २०२१ मध्ये कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी संघप्रमुख मोहन भागवत यांनीही मिथुन यांची अनेकदा भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना पक्षाचा स्टार प्रचारक बनवले. पक्षाचा त्यांनी जोरदार प्रचार केला. त्या वेळी राज्यात भाजप सरकार स्थापन करू शकेल, असा विश्वास होता; परंतु पक्षाला २९४ पैकी केवळ ७७ जागा मिळाल्या. भाजपला अपेक्षित असलेला विजय मिथुन चक्रवर्ती मिळवून देऊ शकले नाहीत.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडला. यामध्ये मुकुल रॉय, बाबुल सुप्रियो यांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या प्रचारादरम्यान मोदी यांच्यासह इतर बड्या नेत्यांनी बंगालमध्ये पक्षाला मोठा विजय मिळेल, असा दावा केला होता. भाजपने बंगालमध्ये ४२ पैकी ३५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते; परंतु २०१९ मध्ये जिंकलेल्या जागांपेक्षाही ते खूप मागे पडले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये १८ जागा जिंकणाऱ्या भाजपला या वेळी फक्त १२ जागा जिंकता आल्या. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापनेचे स्वप्न आहे. पश्चिम बंगाल हे जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे गृहराज्य आहे; पण सततच्या पराभवामुळे आणि घसरत्या आलेखामुळे पक्षाचे कार्यकर्ते निराश झालेले दिसतात.
आज पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती अशी आहे, की भाजपच्या बंडखोर नेत्यांनी ‘भाजप बचाओ’ मंच स्थापन केला आहे. पश्चिम बंगालमधील राजकीय लढा भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात केंद्रीत झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आता अडीच वर्षे उरली आहेत. पश्चिम बंगालमधील खराब राजकीय स्थितीमुळे भाजपला मिथुन चक्रवर्ती यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक वेळा दावा केला आहे, की तृणमूल काँग्रेसचे 30 पेक्षा जास्त आमदार त्यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच राज्यात भाजपचे सरकार स्थापन होईल. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडे कोणताही मोठा लोकप्रिय चेहरा नाही. बंगालमधील लोकप्रिय आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीलाही पक्षाने सामील करण्याचा प्रयत्न केला; परंतु गांगुली त्यासाठी तयार नाही. मिथुन चक्रवर्ती पश्चिम बंगालमधील शहरी आणि ग्रामीण भागात खूप लोकप्रिय आहेत आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला त्यांच्या लोकप्रियतेतून पुन्हा एकदा राजकीय फायदा मिळवायचा आहे.
