कल्याण : प्राचीन मंदिरांपैकी एक आणि पेशवेकालीन मंदिर अशी ओळख असलेल्या टिळक चौकातील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीचा पाचवा दिवस काहीसा खास ठरला. आजच्या ललित पंचमीचे औचित्य साधून कल्याणातील सकल हिंदू समाज आणि श्री महालक्ष्मी प्रतिष्ठानमार्फत महालक्ष्मी मंदिरात महाआरती करण्यात आली. कल्याणचे ग्रामदैवत अशी ओळख असलेल्या किल्ले दुर्गाडी येथील दुर्गादेवी मंदिरानंतर कल्याण पश्चिमेतील या श्री महालक्ष्मी मंदिराची सर्वत्र ख्याती आहे. कोल्हापूर येथे असलेल्या मूळ महालक्ष्मी मंदिरातील देवीसारखी हुबेहूब मूर्ती कल्याणच्या या महालक्ष्मी मंदिरात आढळून येते. त्यामुळे या मंदिरातही केवळ कल्याणच नव्हे तर आसपासच्या परिसरातील शेकडो भाविक नवरात्रोत्सव काळात दर्शनाला येतात. ललित पंचमीनिमित्त सकल हिंदू समाज, श्री महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालेल्या महाआरतीलाही भक्तांची गर्दी उसळली होती. महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांना आरतीचा मान मिळाल्याने या महिलाभक्तांनी अतिशय सुंदर स्वरात ही आरती म्हटली. तर, या जोडीला शंख आणि संबळ वादनाने इथले वातावरण अधिकच भारावून गेले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ सदस्य मधुकर फडके, माजी विस्तारक डॉ. विवेक मोडक, कल्याण पश्चिमेचे विद्यमान विस्तारक विवेक वाणी, पराग तेली, डॉ. दीपक वझे, श्री महालक्ष्मी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि उपशहरप्रमुख नितीन माने यांच्यासह अनेक मान्यवर या महाआरतीत सहभागी झाले होते.