मुंबई : मुंबई पोलीस, रिझर्व्ह बँक, मुंबई कस्टम, हिंदुजा रुग्णालय यांनी शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या विशेष व्यावसायिक गटाची बाद फेरी गाठली. नवोदित संघ, शिवमुद्रा प्रतिष्ठान यांनी कुमार गटाच्या उपांत्य फेरीत धडक दिली. दादर(पूर्व) येथील भवानीमाता क्रीडांगणावर सुरू असलेल्या विशेष व्यावसायिक गटाच्या फ गटात मुंबई पोलिसांनी गंधेकर इलेक्ट्रिकचा ४०-२५ असा पराभव केला खरा.पण सुरुवातीची १० मिनिटे गंधेकर संघाने पोलिसांच्या तोंडाला फेस आणला. गंघेकरच्या ऋतिक नागलेने एकाच चढाईत ३ गडी टिपत ६व्या मिनिटाला पोलीस संघावर लोण दिला आणि १४-०४ अशी आघाडी घेतली. पण गंघेकर संघाला ती टिकविता आली नाही. पोलीस संघाने आपला खेळ गतिमान करीत पूर्वार्धात २लोण देत २३-१७ अशी आघाडी घेतली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पोलिसांच्या हनुमंत गर्जेने एकाच चढाईत ४गडी टिपत या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला रणजित मस्केची उत्तम साथ लाभली. गंघेकर संघ अनुभवात कमी पडल्याने त्यांना साखळीतच गारद होण्याची वेळ आली.
हिंदुजा रुग्णालयाने ड गटात अत्यंत चुरशीच्या लढतीत के.ई.एम. रुग्णालयाचा २२-१९ असा पाडाव करीत बाद फेरीतील आपले स्थान निश्र्चित केले. मध्यांतराला ११-०९ अशी आघाडी घेणारा हिंदुजा संघ शेवटच्या काही मिनिटात पिछाडीवर पडला होता. पण शेवटी हिंदुजाने ३गुणांनी बाजी मारली. जितेंद्र बुगडे, संतोष वारकरी यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. के.ई.एम. च्या अथर्व सुवर्णा, हर्षल दळवी यांनी कडवी लढत दिली. ब गटात रिझर्व्ह बँकेने माझगाव डॉक वर ३२-१७ अशी मात करीत आरामात बाद फेरी गाठली. ओमकार थोटे, यश राक्षे यांच्या चतुरस्त्र खेळामुळे बँकेला हे शक्य झाले. मुंबई कस्टमने ब गटात टी.बी.एम.चा ४३-१८ असा धुव्वा उडवीत आगेकूच केली. अक्षय तावडे, रजत सिंग, सुशांत साहिल यांच्या उत्कृष्ट खेळाने त्यांना बाद फेरी गाठता आली. ई गटात बेस्ट ने सिद्धी कंट्रक्शनचा ४२-२९ असा, तर ग गटात जी.पी.ओ.ने माटुंगा वर्क शॉपचा ४०-२६ असा पराभव करीत बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.
कुमार गटात नवोदित संघाने अथर्व सुवर्णा, ऋषी माळवी यांच्या झंझावाती खेळाच्या जोरावर वीर नेताजी मंडळाचा ३८-१० असा धुव्वा उडवीत उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात शिवमुद्रा प्रतिष्ठानने साऊथ कॅनरा स्पोर्ट्स चा ३४-१४ असा पाडाव करीत उपांत्य फेरी गाठली. अरुण हातकर, राकेश धर्मा यांच्या चतुरस्त्र खेळामुळे शिवमुद्राने हा विजय साकारला. साऊथ कॅनराचा सिद्धाराम पवार बरा खेळला.
