ह.भ.प. शामसुंदर महाराज. सोन्नर यांचे शेतकऱ्यांना आवाहन
राजेंद्र साळसकर
तेलगाव : शेतकऱ्यांची एकजूट ही कोणताही लढा जिंकू शकते. मात्र शेतकऱ्यांची एकजूट होऊ नये म्हणून त्यांना जातीय संघर्षांत अडकवले जात आहे. त्यांच्या धार्मिक अस्मिता टोकदार केल्या जात आहे. आपले हक्क मिळवायचे असतील तर शेतकऱ्यांनी जात धर्म विसरून एक व्हावे, असे आवाहन ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने बीड जिल्ह्य़ातील तेलगाव येथील संकटमोचन हनुमान मंदिरात धरणे आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी शामसुंदर महाराज यांनी कीर्तनातून शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, ज्याची कुणी मागणी केली नाही अशा योजनांवर सरकार कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करीत आहे. मात्र शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. जाहीर केलेले अनुदान, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मागूनही वेळेवर मिळत नाहीत. कारण शेतकऱ्यांची एकजूट नाही. खरं तर शेतीवर उपजिविका करणारा मोठा वर्ग देशात आहे. मात्र तो एकत्र येऊ नये म्हणून त्यांत फूट पाडली जात आहे. धर्माच्या अस्मिता टोकदार करून धार्मिक विद्वेष वाढविला जात आहे. त्यामुळे आपल्या खऱ्या प्रश्नांची जाणीव होत नाही. आता तरी शेतकऱ्यांनी सावध व्हावे. जात धर्माच्या चौकटीतून बाहेर येऊन शेतकरी म्हणून एक व्हावे, तरच आपल्याला न्याय्य मिळेल, असेही शामसुंदर महाराज म्हणाले.
किसान सभेचे बीड जिल्हा अध्यक्ष काॅ. अजय बुरांडे यांनी या धरणे आंदोलनामागील भुमिका स्पष्ट केली. आम्ही नवीन काही मागत नाहीत, सरकारनेच जे जाहीर केलं आहे ते वेळेत द्यावे याठी हे आंदोलन असल्याचे सांगितले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार कॉम्रेड दत्ता डाके कॉम्रेड भगवान बडे श्री. विठ्ठल दादा लगड यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी न्यायाधीश बाबुराव तिडके, कॉ. सुभाष डाके, विष्णू देशमुख, कॉ. सुदाम शिंदे, कॉ. सय्यद रजक आदी उपस्थित होते.
कागदावरच पीठलं-भाकरीचा महाप्रसाद
किसान सभेच्या आंदोलकांनी कीर्तन संपल्यानंतर आपापल्या घरातून आणलेले पिठल भाकरी काढल्या. वर्तमान पत्राच्या कागदावर वाढून घ्यायला सुरुवात केली. शामसुंदर महाराज यांची जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. मात्र तिकडे न जाता शामसुंदर महाराज यांनी सर्व आंदोलकांसोबत कागदावरच पीठल-भाकर वाढण्यास सांगितले. कार्यकर्ते घरी जेवणाची चांगली व्यवस्था केली असल्याचे सांगत होते. मात्र गोपाल कृष्णाने अशाच सर्व गोपाळांच्या शिदो-या एकत्र करून काला केला होता. आज तुमच्या सर्वांच्या घरातून आलेल्या या भाकरी त्या गोपाल कृष्णाच्या काल्याच्या प्रसादासारख्या आहेत, असे सांगून पीठल-भाकरीच्या महाप्रसादाचा आनंद वर्तमान पत्राच्या कागदावरच महाराजांनी घेतला.