कल्याण : कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी गुणवंत विद्यार्थी सोहळ्याच्या निमित्ताने कल्याण पश्चिम, मोहने, टिटवाळा भागात लावण्यात आलेले रस्त्यांवरील फलक काही अज्ञातांनी फाडून टाकले आहेत. याप्रकरणी राजकीय, सामाजिक शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, बाजारपेठ पोलिसांकडे केली आहे.

दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पवार यांच्याकडून कल्याण पश्चिम, मोहने आणि टिटवाळा भागात रविवारी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे शुभेच्छा देणारे फलक पवार यांच्या प्रतीमेसह शहराच्या विविध भागात लावण्यात आले आहेत. काही अज्ञातांनी बैलबाजार, के. सी. गांधी शाळा परिसरात लावलेले फलक फाडून टाकले आहेत. गणेशोत्सव काळातही असाच प्रकार घडला होता, असे पवार यांनी सांगितले.

कल्याण पश्चिमेचे भाजप आमदार म्हणून यापूर्वी नरेंद्र पवार यांनी विधीमंडळात नेतृत्व केले आहे. आता पुन्हा त्यांना कल्याण पश्चिमेतून महायुतीमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वाटत आहे. त्यामुळे आपल्या प्रचाराचा भाग म्हणून ते दोन वर्षापासून विविध कार्यक्रम कल्याण पश्चिमेत घेत आहेत. जनसंघटन, महिला बचत गट मेळावे सारखे कार्यक्रम घेऊन ते मतगठीत करण्याचे प्रयत्न करत आहेत. पवार यांचे हे प्रयत्न काही मंडळींना त्रासदायक वाटत असल्याने ते हा उद्योग करत असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातून विश्वनाथ भोईर, शहरप्रमुख रवी पाटील, श्रेयस समेळ, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सचिन बासरे, विजय साळवी, काँग्रेसमधून सचिन पोटे, राजाभाऊ पातकर, मनसेमधून प्रकाश भोईर इच्छुक आहेत.

काही मानसिक विकृती असलेली लोकच हा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून करत आहेत. या प्रकाराने सामाजिक, राजकीय शांतता बिघडविण्याचे काम होत आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *