नवी दिल्ली : “हिंदू समाजातील एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवत ठेवायचं, ही काँग्रेसचे धोरण आहे. काँग्रेसला माहितीये की, जितकी हिंदूमध्ये फूट पडले, तितकाच त्यांना फायदा होईल. हिंदू समाजात आग भडकत राहावी, असे काँग्रेसला वाटत राहते. कारण त्यावर राजकीय भाकऱ्या भाजता येतील. भारतात जिथे कुठे निवडणुका होतात, तिथे काँग्रेस हा फॉर्म्युला अंवलंबते”, काँग्रेसचा हा कट महाराष्ट्र उधळून टाकेल असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.

महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालये आणि इतर कामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसचा फॉर्म्युला स्पष्ट आहे की, मुस्लिमांना घाबरवायचे, त्यांना भीती दाखवायची. त्याचे रुपांतर व्होटबँकेत करायचं. ती मजबूत करायची. काँग्रेसच्या एकाही नेत्यांने आजपर्यंत कधीही विचारलं नाही की, आपल्या मुस्लीम भाऊ-बहि‍णींमध्ये किती जाती असतात? मुस्लिमांमधील जातींचा विषय येताच काँग्रेस नेते तोंडाला कुलूप लावून बसतात; पण जेव्हा हिंदूंचा विषय येतो. तेव्हा काँग्रेस ही चर्चा जातींपासूनच सुरू करते.”

“महात्मा गांधी म्हणाले होते की, काँग्रेसचं विसर्जन करायला हवे. पण, काँग्रेस स्वतः संपली नाही; आज देशाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपाल्याला सतर्क राहायचं आहे. मला विश्वास आहे की, समाजाला तोडण्याचे जे प्रयत्न आज होत आहेत, असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील. महाराष्ट्रातील लोकांनी देशाच्या विकासाला सर्वोच्च स्थानी ठेवून भाजपा महायुतीला मतदान करावं. हरयाणा तर भाजपा जिंकली, आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे”, असे आवाहन मोदींनी केले.

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *