भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांचा पुढाकार
ठाणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून तडकाफडकी कामावरुन काढून टाकलेल्या १४८ कंत्राटी कामगारांना पुन्हा नोकरी मिळाली आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी पुढाकार घेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांना साकडे घालून या कामगारांना पुन्हा नोकरी मिळवून दिली. सर्व कामगार आज पुन्हा कामावर रुजू झाले असून, या कामगारांनी महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात गेल्या सहा ते सात वर्षांपासून १४८ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करीत होते. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जलकुंभ, व्हॉल्व्ह आणि बिलांचे वाटप आदी कामे त्यांच्याकडे सोपविलेली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी कंत्राटदाराने अचानक सर्वांना काढून टाकले. त्यातील काही जणांनी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांना साकडे घातले होते. त्यानंतर भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना कामगारांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती.
महापालिकेचे आयुक्त सौरभ राव व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या प्रश्नांवर सुरुवातीपासून आयुक्त राव यांची भूमिका सहानुभूतीची होती. अखेर आज आयुक्तांच्या आदेशानंतर संबंधित कंत्राटदाराने सर्व १४८ कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास मान्यता दिली. सर्व कामगार आज पुन्हा कामावर रुजू झाले. या कामगारांना दिवाळीचा बोनस मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी सांगितले.
पुन्हा नोकरी मिळाल्याचा आनंद तरुणांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या निर्णयानंतर त्यांनी महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर जल्लोष केला. तसेच आयुक्त सौरभ राव, माजी नगरसेवक भरत चव्हाण, युवा मोर्चाचे सचिव ओमकार चव्हाण यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे आभार मानले.
यापुढील काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कंत्राटी कामगारांना आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही भरत चव्हाण यांनी दिली.