अनिल ठाणेकर /अरविंद जोशी

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर व प्रारुप विकास योजनेतील फाऊंटन ते गायमुख हा प्रस्तावित ३०.०० मी, रुंद रस्ता ६०.०० मी. रुंद करणेबाबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काल मंजुरी दिली आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून एमएमआरडीए आता टेंडर प्रक्रिया सुरु करणार असून आचारसंहिता संपल्यानंतर या रस्त्याचे काम सुरु केले जाणार आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

वाहनांची वाढती प्रचंड संख्या , होणारी तीव्र वाहतूक कोंडी आणि मेट्रोचे काम सुरु करण्यासाठी हे रस्ता रुंदीकरण करणे खूप आवश्यक आहे.  ‘फाउंटन हॉटेल ते गायमुख’ पर्यंत भविष्याचा विचार करून रस्ता दुप्पट म्हणजेच ६० मीटर रुंद करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी वेळोवेळी केली होती व ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करून या रस्ता रुंदीकरणाच्या कामास काही महिन्यांपूर्वी मंजुरी दिली. आता नगरविकास विभागाने त्यास अधिकृत मान्यता दिली आहे. या रुंदीकरणाच्या खर्चाचे अंदाजपत्रकही एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी तयार केले आहे.  एम एम आर डी एच्या माध्यमातून हा रस्ता विकसित केला जाणार आहे. आमदार सरनाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले. MMRDA चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी व आमदार सरनाईक यांच्यात या रस्त्याच्या कामाबाबत सर्व अधिकारी वर्गासह तीन वेळा बैठका झाल्या आणि कामाला गती आली. “मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेमध्ये फाऊंटन ते गायमुख या दरम्यानच्या ३०.०० मी. रुंदीचा विकास योजना रस्ता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील तरतुदीनुसार ६०.०० मी. रुंद मंजूर विकास योजनेमध्ये दर्शविण्याची कार्यवाही आयुक्त, महानगरपालिका यांनी त्वरित करावी” असे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. म्हणजे राज्य सरकारने मंजुरी दिली असल्याने टेंडर प्रक्रिया सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे आमदार सरनाईक म्हणाले.राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर आता टेंडर प्रक्रिया आचार संहिता काळात पूर्ण केली जाईल. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली व आचार संहिता संपली की या रस्त्याचे काम सुरु केले जाईल. साधारण दोन वर्षाच्या कालावधीमध्ये या रस्त्याचे काम केले जाईल , असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. हा रुंद रस्ता झाल्याने वाहतूक कोंडीची कायमची डोकेदुखी दूर होणार आहे. हे ६० मीटर रस्ता रुंदीकरण काम सुरु करत असताना सध्याच्या ३मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूस १५-१५ मीटर जागेत रस्ता वाढवावा. त्यात आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी जातात. हे आदिवासी शेती करून उदरनिर्वाह करतात. रस्त्यासाठी जमिनी घेताना त्यांना मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर चांगला मोबदला द्यावा व भूसंपादन करावे , अशी मागणीही आमदार सरनाईक यांनी सरकारकडे केली आहे. ‘फाऊंटन हॉटेल ते गायमुख’पर्यंत साधारण साडेचार किलोमीटर रस्ता असून सध्या तो ३० मीटर इतका आहे. घाटात त्याची रुंदी कमी आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या व वाहतूक कोंडी, होणारे अपघात वाढत आहेत. चढण उतारावर एखादे जड वाहन बंद पडले किंवा अपघात झाला तर लगेच वाहतुक कोंडी होते. वाहनांच्या रांगा लागतात. लोकांना दोन दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे हे रस्ता रुंदीकरण मार्गी लागल्याने ठाणे ते मीरा भाईंदर शहरातील लाखो नागरिकांचा व कामानिमित्त या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर नागरिकांचाही फायदा होणार आहे. याच रस्त्यावरून गायमुख ते दहिसर चेकनाका अशी मेट्रोही जाणार असल्याने युद्धपातळीवर रुंदीकरणाचे काम व त्याची प्रक्रिया करण्याबाबत शासन स्तरावरून आदेश आहेत. या रस्ता रुंदीकरणाची मागणी मान्य करून मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांचे आमदार सरनाईक यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *