महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत – महेंद्रशेठ घरत
पनवेल : रायगडमध्ये महाविकास आघाडी एकसंघ असून त्यात कोणतीही बिघाडी होणार नाही, असा ठाम आत्मविश्वास रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी व्यक्त केला आहे. रायगड जिल्ह्यामधील उरण विधानसभा मतदार संघावर काँग्रेसनेही दावा केला आहे. पारंपरिक अलिबाग, पेण आणि पनवेल या मतदार संघावर सद्यस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचा हक्क असून महाड विधानसभा मतदार संघात काँग्रेस ऐवजी शिवसेनेकडे हा मतदार संघ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वासाठी उरण विधानसभा मतदार संघ काँग्रेसला मिळण्यासाठी महाविकास आघाडीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आग्रह केला आहे. तरीही महाविकास आघाडीचा जो कुणीही उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे संपूर्ण महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते उभे राहतील, असा विश्वास महेंद्र घरत यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला त्या त्या मतदार संघात दावेदारी करण्याचा अधिकार आहे, तरीही जर कोणी स्वबळाची भाषा करीत असेल तर महाविकास आघाडीतील कार्यकर्ते हे मेनी करणार नाहीत. उरण विधानसभा मतदार संघात शेकापला उमेदवारीसाठी दावेदारी करण्याचा अधिकार नक्कीच आहे, मात्र महाविकास आघाडीचे आपण घटक पक्ष आहोत याचे त्यांनी भान ठेवणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असला तरच तो भाजपला प्रभावीपणे टक्कर देऊ शकेल. मात्र भाजपच्या उमेदवाराच्या फायद्यासाठी कोणी उमेदवारी करीत असेल तर ते कार्यकर्ते खपवून घेणार नाहीत.
२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेकाप बरोबर काँग्रेस पक्षही तत्कालीन आघाडीत होता. तेव्हा काँग्रेस पक्षाची भरघोस मते मिळाल्यामुळे विवेक पाटील हे ६० हजारांचा पल्ला गाठू शकले. त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे मतदान हे निर्णायक होते. तेव्हा भाजपचे उमेदवार महेश बालदी यांच्याशी कोणाचे साटेलोटे होते, हे येथील सुज्ञ जनतेला सांगायला नको. महाविकास आघाडीला तडा देण्याचा कोणी प्रकार केला, तर येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार धुमाळीत त्यांचा योग्य समाचार घेतला जाईल, असेही महेंद्र घरत यांनी सांगितले.
चौकट
नुकताच लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी पुन्हा एकदा विमानतळ समितीने केंद्रीय उड्डाणमंत्री किंजरापु नायडू यांची भेट घेऊन नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा, अशी विनंती केली. मात्र २ – ३ दिवसात आचारसंहिता लागणार असून आता ते नामांतराची प्रक्रिया केव्हा पूर्ण करणार. तसेच या समितीमध्ये बहुसंख्य सदस्य हे भाजपचे असल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी राजकारण करण्याचे नाटक करीत असल्याची खरमरीत टीका महेंद्र घरत यांनी केली आहे.
