हुकुमशाही विरोधात लोकशाहीचे विचूंबे ग्रामस्थांचे झळकले बॅनर

राज भंडारी

पनवेल : नवीन पनवेल ते विचुंबे येथील गाढी नदीवरील जुना पुल जीर्ण झाला असल्यामुळे याठिकाणी नव्याने पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाचे लोकार्पण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते पार पडणार असल्यामुळे विचुंबे येथील ग्रामस्थांनी हुकुमशाही विरोधात लोकशाही अशा आशयाचे बॅनर लावून ना. रविंद्र चव्हाण यांचे स्वागत करण्यासाठी बॅनर उभारले. मात्र विचुंबे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सदर बॅनर हे तत्काळ हटविण्यात आल्यामुळे ग्रामस्थांची चेष्टा तर केली जात नाही ना, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

 

गाढी नदीवरील विचुंबे पूल धोकादायक असल्याचा तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाला नसतानाही केवळ तत्कालीन महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारीवरून पूल धोकादायक ठरविल्याचा प्रकार झाला. याठिकाणी सर्वसामान्य प्रवाशांची एनएमएमटी एक दिवसात बंद झाल्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचे पत्र तसेच उद्भवलेल्या तक्रारींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, यानंतर या पुलाच्या कामासंदर्भात तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पुलाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या पुलाबाबत तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाबाबत सर्वस्वी श्रेय हे ग्रामस्थांचे असल्यामुळे आणि श्रेय लाटण्याचे प्रकार इतरांकडून घेण्याचे काम सुरू असल्यामुळे याठिकाणी ग्रामस्थांकडून हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचे बॅनर झळकविण्यात आले.

 

याबाबत येथील स्थानिक ग्रामस्थांनी आमच्याशी बोलताना सांगितले की, गेल्या ५ वर्षांत तालुक्याचे किंवा बाहेरचे पदाधिकारी आमच्या विचुंबे गावात फिरकताना दिसले नाहीत. केवळ ग्रामपंचायत निवडणुका असताना आमच्या समोर आले. या पुलाची मागणी ही आम्हा ग्रामस्थांची असताना देखील पुलाच्या उद्घाटनाचे राजकारण करून ठराविक लोकांना हाताशी धरून हे उद्घाटन पार पाडले जात आहे. त्यातच आम्ही ग्रामस्थ म्हणून बॅनर लावले तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ते का काढण्यात आले ? ग्रामपंचायत ही विचुंबे मध्ये राहणाऱ्या रहिवाशांची आहे की लोकप्रतिनिधींची ? असा प्रश्न देखील आम्हाला उपस्थित झाला आहे.

 

सदर पुलाच्या बांधकामासाठी काही दिवसांपूर्वी गावातील बेंजो पथकाचे कार्यालय याच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तोडले गेले. स्वार्थासाठी ग्रामस्थांच्या भावनांशी खेळून या पुलाचे उद्घाटन करण्यात येत आहे. विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांनी गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंचपदी विजय मिळविला, आणि काही महिन्यातच आपले रंग ग्रामस्थांना दाखविण्यास सुरुवात केली. त्यामुळे गावाचे बेंजो पथकाचे कार्यालय तोडण्याच्या या घटनेवरून ग्रामस्थांमध्ये भाजप विरोधी रोष पाहायला मिळत आहे. त्यातच कोणालाही उद्देशून न बोलता केवळ हुकुमशाही विरोधी लोकशाही या आशयाचे बॅनर देखील हटविण्यात आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *