मुंबई:- शिवशक्ती, डॉ. शिरोडकर, श्री स्वामी समर्थ यांनी शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या महिलांच्या कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक दिली. कुमार गटात विजय क्लब, अमर क्रीडा मंडळ हे उपांत्य फेरीत दाखल झाले. दादर(पूर्व), शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडांगणावर सुरू असलेल्या महिलांच्या सामन्यात स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या शिवशक्ती महिला संघाने गोलफादेवी प्रतिष्ठानचा ५३-०५ असा धुव्वा उडविला. पूर्वार्धात ३, तर उत्तरार्धात २लोण देत शिवशक्तीने गुणांचे अर्धशतक पार केले. गोलफादेवीला दोन आकडी गुणसंख्या देखील गाठता आली नाही. आंतर राष्ट्रीय खेळाडू सोनाली शिंगटे व पूजा यादव यांच्या झंझावाती चढाया त्यांना साधना विश्वकर्माची मिळालेली भक्कम बचावाची साथ यामुळे हे सहज शक्य झाले.

डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स ने चंद्रोदय मंडळाला ४०-१० असे नमवित आपली घोडदौड चालूच ठेवली. पहिल्या डावात दोन लोण देत २५-०१ अशी आघाडी घेणाऱ्या शिरोडकरने नंतर मात्र सावध खेळ करीत आपला विजय साकारला. नेहा कदम, भाविका राऊळ यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. चंद्रोदयची श्रेय साठे चमकली. श्री स्वामी समर्थ मंडळाने अमर हिंद मंडळाला ४१-३७ असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. शेवटच्या क्षणापर्यंत सामना चुरशीने खेळाला गेला. साक्षी जंगम, मयुरी पाटील यांनी स्वामी समर्थ कडून, तर सलोनी नाक्ती, भूमी मर्चंड यांनी अमर हिंद कडून उत्कृष्ट खेळ केला.

 

विजय क्लबने कुमार गटात एस.एस.जी. फाऊंडेशनचा ३७-३२ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. अत्यंत चुरशीने खेळाला गेलेल्या या सामन्यात विश्रांतीला १९-१७ अशी विजय क्लब कडे आघाडी होती. रोहन राज, आरिफ शेख विजय क्लब कडून, तर देवेंद्र कदम, सूरज जाधव फाउंडेशन कडून उत्तम खेळले. दुसऱ्या सामन्यात काळाचौकीच्या अमर मंडळाने श्रीराम विश्वस्त संघाला ३५-३४ असे चकवित उपांत्य फेरीत धडक दिली. पहिल्या डावात दोन्ही संघ १७-१७ असे बरोबरीत होते. दुसऱ्या डावात शेवटच्या क्षणी गुण घेत अमरने  बाजी मारली. रमेश रायकर, प्रतीक यांना अमरच्या विजयाचे श्रेय जाते. आदित्य पार्ले, कार्तिक शेट्टी यांनी श्रीराम कडून कडवी लढत दिली.

 

विशेष व्यावसायिक गटात मुंबई पोष्टल, युनियन बँक, जे.जे.रुग्णालय, मध्य रेल्वे डिव्हीजन, रुबी कंट्रक्शन यांनी बाद फेरी गाठली. ग गटात मुंबई पोष्टलने रुपाली ज्वेलर्सला ४१-२७, युनियन बँकने सिद्धी कंट्रक्शनला ३९-१०, रुबी कंट्रक्शनने माझगाव डॉकला ३५-३१, जे.जे. रुग्णालयने मुंबई अग्निशमन दलचा ४४-२८ असा पराभव करीत बाद फेरी गाठली. मुंबई महानगर पालिकेने न्यू इंडियाला ४६-३८ असे पराभूत केले.पण गुण फरकामुळे या दोन्ही संघांनी बाद फेरी गाठली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *