हरयाणात जसे जाटांचे प्राबल्य होते तसेच प्राबल्य महाराष्ट्रात मराठ्यांचे आहे. तिथे जाट पंचवीस टक्के आहेत, इथे तीस ते तेहेत्तीस टक्के मराठे आहेत, असे सांगितले जाते. त्यात कुणबी किती व मराठे किती हा संशोधनाचा विषय आहे. पण आता जरांगे पाटलांचे काय होणार ? मराठ्यांच्या असंतोषाच्या धगीवर भरंवशावर भाजपाल हरवण्याचे मनसुबे रचणाऱ्या, शरद पवार व उबाठाचे काय होणार ? आणि सर्वात महत्वाचा सवाल म्हणजे नाना पटोलेंसह काँग्रेसचे नेते हे शिवसेनेच्या वाढत्या महत्वाकांक्षेंमधून मार्ग काढून महा विकास आघाडीची नौका निकालाच्या पैलतीराला कशी नेणार ? शोलेतील गब्बर प्रमाणे मविआच्या नेत्यांना हे सवाल सतावत आहेत की “अब तेरा क्या होगा, कालिया” ?!!
चार सहा महिन्यांपूर्वी कोणालाही विचारले असते की, हरयाणात सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय होईल ? तर प्रत्येकाने न चुकता सांगितले असते, की “नक्की कॉँग्रेसच जिंकणार आहे! पुढचे हरयाणाचे सरकार, हे भूपेंद्र हूडा वा दीपेन्द्र हुडा या पिता-पुत्रां पैकीच कोणीतरी स्थापन करेल. दलित नेत्या खासदार कुमारी शैलजा यांचाही विचार पक्षत्रेष्ठी करू शकतात, पण सरकार येईल ते काँग्रेसचेचे असेल…!” इतके सोपे राज्य होते. पेपर सगळा आधी ठरल्या सारखाच होता, तरी पोरगं परीक्षेत नापास झाले, तर आई-बापांची जशी अवस्था होईल तशीच आज तिथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची झालेली आहे.
शेतकरी आंदोलनात हरयाणाचे शेतकरी भरडले गेले होते. डझनावारी हरयाणवी शेतकऱ्यांचा मृत्यु दिल्लीत ठाण मांडले असनाता झाला होता. शेतीनंतर हरयणाताली मोठा व्यवसाय जर कोणता असेल तर तो आहे, लष्करी सेवेचा. सुरक्षा सेवेचा. तिथेही अग्निपथ नावाच्या नव्या योजनेमुळे अस्वस्थता तयार झालेली होती. जी पोरं अलिकडे सैन्यदलात दाखल झाली, ती तीन ते पाच वर्षानंतर बेकार होणार, या आशंकेचे मोठे सावट त्या राज्यात होते आणि शिवाय पैलवानगिरी हाही एक मोठा लोकप्रिय क्रीडा प्रकार हरयणात आहे. जगभरातील कुस्तीची मैदाने मारणारे हरयणाचे वीर आणि वीरांगना, तिथे गल्लोगल्ली सापडतात. तिथेलीच विनेश फोगाट ही ऑलिंपिक जवळ जवळ जिंकून पण निराशेने परत आली होती आणि काँग्रेसमध्ये सामील झाली. त्या आधी वर्षभर ती दिल्लीच्या रस्त्यावर न्यायासाठी भांडत होती. पोलीस तिला व अन्य पैलवान मुलींना, उपोषणाच्या मैदानात त्यांना साथ देणाऱ्या पुरुष खेळाडूंना फरफपटत घेऊन जात आहेत, ती ज्याच्या विरोधात लढते तो भाजपाचा खासदार लैंगिक शोषणाच्या आरोपांत संशयीत असूनही कुस्ती महासंघात ठाण मांडूनच बसलेला आहे, हेही हरयणातील जनता संतापून व अस्वस्थतेने पाहातच होती. त्यामुळे, “किसान, पेहलवान आणि जवान,” या त्रीसूत्री भोवतीच ही निवडणूक फिरणार, ही लोकांना, पक्षीय नेत्यांना आणि त्याच बरोबर राजकीय पंडित म्हणून मिरवणाऱ्या चॅनेलवीर पत्रकार संपादकांना वाटत होती.
मतदान झाले 4 ऑक्टोबरला आणि निकाल आले 8 ऑक्टोबरला दुपार नंतर. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये ( एक्झीट पोल) हीच समजूत कायम राहिली. त्या आकड्यांच्या आधारे भाजपाला आणि मोदींच्या नेतृत्वाला धोपटण्याचेही कार्यक्रम सुरु झाले. 8 तारखेला निकाल लागेपर्यंत हीच समजूत कायम राहिली की, “जिंकलीच की काँग्रेस ! ” पण प्रत्यक्षात अंतिम मतमोजणीत मात्र पूर्ण निराळे चित्र पुढे आले. भाजपाला, मागच्या पेक्षा अधिक आमदारसंख्या घेऊन, सत्ता स्थापनेचा सुस्पष्ट आदेश जनतेने दिला.
“याला काय म्हणावे ?” या विचारात पडलेले जयराम रमेश, पवन खेरा यां सारखे काँग्रेसचे, प्रत्यक्ष निवडणूक मैदानात अंगाला मातीही न लावणारे, राज्यसभा निवासी, जे नेत होते, ते सारे म्हणू लागले की, “खरेतर हा तंत्राचा, भाजपाच्या डबल इंडिन सरकारच्या कारस्थानाचा विजय आहे. मतदन यंत्रांतील बॅटऱ्यांची हेरा-फेरी झालेली आहे. ज्या मतदान यंत्रांवर 99 टक्के बॅटरी जिवंत होती, तिथे भाजपाचा विजय झाला आणि ज्या मतदान यंत्रांत 60 ते 70 टक्के बॅटरी जिवंत होती तिथे मात्र काँग्रेसच्या बाजूने निकाल येत होता, हेसारे या कारस्थानाचे फळ होते…” असला आचरटपणाचे तर्कट हे विद्वान काँग्रेस नेते मांडू लागले.
पण जे प्रत्यक्ष रणमैदानात लढले त्या नेत्यांना मात्र या पराभवाची कल्पना आधीच आलेली असावी. भूपेंद्र हूडा आणि कुमारी शैलजा यांनी एकमेकांवर पराभवाचे खापर फोडण्याची संधी घेतली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांनी, आपल्या आमदारांची संख्या वाढली आणि मतांची ट्ककेवारीही मागच्या पेक्षा अधिक आली, यावरच समाधान मानत, मतदारांचे आभार मानले आणि “भाजपाच्या हुकुमशाहीच्या विरोधात आपली लढाई जारीच राहील”, असेही धैर्य कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न केला. पण या सर्वात आता पुढे काय होणार आहे ? झाले ते नेमके कसे व का झाले ? याचीच चर्चा रंगते आहे.
सर्वात मोठा या निकालाचा सवाल म्हणा वा धडा म्हणा हा आता दोन महिन्यांत महाराष्ट्रात काय होणार हा आहे ? हाच आहे. “अब तेरा क्या होगा कालिया?” असे गब्बरच्या चालीवर, ठाकरे, शरदराव आणि पटोलेंना विचारावे लागेल…!! हरयाणाताली निकालानंतर आता महाराष्ट्रात राजकीय मंथन सुरु झाले आहे.
हरयाणाच्या लढतीत अनेक विरोधी पक्ष होते, पण खरी लढत झाली ती भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यातच. कारण आम आदमी पार्टी असेल वा चंद्रशेखर आझादांचा पक्ष असेल, मायावती असतील वा देवीलाल यांच्या कटुंबातील अनेक नेते असतील, कोणाचाच, कोणताही प्रभाव मतदानात दिसला नाही. आम आदमी पार्टीला तर खातेही उघडता आले नाही. दुष्यंत चौटाला यांनी जननायक जनता पार्टीच्या झेंडा नाचवत, मागील 2019 च्या, विधानसभा निवडणुकीत चांगला प्रभाव दाखवला होता. भाजपा आणि काँग्रेस, कुणालाच तेंव्हा स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. मग दहा आमदारांच्या जोरावर हे दुष्यंत किंगमेकर बनले होते आणि त्यांनी भाजपा सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदीही पटकावले होते.
यंदा मात्र सहा महिने आधी, लोकसभा निवडणुकीत, भाजपाचा प्रभाव कमी झाला असे जाणवले आणि हे महाशय स्वतंत्रपणाने लढण्यासाठी मैदानात उतरले. त्यांची पुरती वाताहत झाली. एकही जागा तर आलीच नाही, पण त्यांचे स्वतःचेही डिपॉझिट जप्त झाले. त्यांच्या बरोबर चंद्रशेखर आझाद या नव्या दमाच्या दलित मसिहाचा पक्ष आघाडी करून लढला. त्यांच्याही हाती मतदारांनी भोपळा दिला. 90 विधानसभेच्या जागांपैकी दोन चौटाला बंधु आणि दोन चार अपक्ष वगळता, काँग्रेसचे 37 आणि भजापाचे 48 आमदार विधानसभेत गेले. म्हणजेच दोन हत्तींच्या टकरीत लहान पक्ष आणि अपक्षांची वाताहत झाली.
काँग्रेसचे नेते मात्र ईव्हीएम बरोबरच अपक्षांवर पराभवाचे खापर फोडू पहात आहेत. भाजपाच्या जिंकलेल्या उमेदवारांच्या मताधिक्या पक्षा काही ठिकाणी अपक्षांची मते प्रचंड होती. उदाहरणार्थ सोहाना मतदारसंघात काँग्रेसच्या पराभवाचे मार्जिन अपक्षाला पडलेल्या मतांपेक्षा 37 हजारांनी कमी भरले आहे. नरवाणात हा फरक 35 हजारांच्या आसपास आहे तर उच्छान-कालनमध्येही 31 हजारांचे मताधिक्य अपक्षाने घेतले आहे. या प्रकारे 14 मतदारसंघात अपक्षांना पराभवाच्या मार्जिनेपक्षाही अधिकची मते पडल्याचे आकडेवारी सांगते. पण आकडेवारीत यणारे चित्र हे नेहमीच पुरेसे नसते. जमिनीवर काय स्थिती झाली होती, हे पाहणे महत्वाचे असते.
लोकसभा निवडणुकीत चारशेचे स्वप्न पाहत असताना 240 खासदार निवडून आणणातानाही भाजपाची दमछाक झाली होती. पण त्या धक्कादायक निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून भजापा नेते हरयणासाठी कामाला लागलेले दिसले. अग्निवीर योजनेत त्यांनी मोठा बदल केला. आता अग्नीवीरांना लष्करातील नोकरी संपल्यावर सैन्यात तसेच अन्य सुरक्षा दलांमध्ये कायम स्वरुपी नोकरी मिळणे सोपे जाणार आहे. त्यामुळे नाराजीचा एक मुद्दा निकाली निघाला. कुस्तीगीर परिषदेतील गैरप्रकाराबद्दल खा. ब्रजभूषण वर खटला भरला गेला, त्याला लोकसभेचे भाजपाचे तिकीटही दिले नाही.
भाजपा प्रणित केंद्र सरकारने शेती संबंधी धोरणांना आंदोलकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीच्या आधी व नंतर बरीच मुरड घातली. सर्वात जहाल विषय झालेले कृषी कायदे मागे घेतले गेले.
गेल्या 4 जून रोजी लोकसभेचा निकाल आला व नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्या नंतरच्या तीन-चार महिन्यांत धान्यांचे हमी भाव वाढले. कृषीक्षेत्रात अधिक संशोधन व्हावे यासाठी मोठ्या योजना जाहीर झाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केले. या साऱ्याचा इष्ट परिणाम भाजपासाठी दिसला.
हरयाणात सर्वात मोठा घटक होता तो जाट विरुद्ध दलित. त्यात काँग्रेसने मार खाल्ला आहे. जाट बहुल पंचवीस जागांपैकी भाजपाने 18 जागा जिंकल्या. पण तिथल्या जाटांपेक्षा दलित व ओबीसींनी भाजपाला मोठ्या प्रमाणात मतदान केले असेही स्पष्ट झाले आहे. जाटांचे मतदान तिथे पंचवीस टक्केंपेक्षा अधिक आहे. ते भाजपा विरोधात गेले आहेत हे लक्षात घेऊन आधी पासूनच भाजपाने जाटेतर जाती-जमातींना आंजारले गोंजारले.
या शिवाय काँग्रेसने आपणच जिंकणार या अतिआत्मविश्वासाच्या भरात इंडिया आघाडीतील कोणाच मित्रपक्षाची कदर तिथे केली नाही. आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टीला एकही जागा दिली नाही. परिणामी या पक्षांनी इतरां बरोबर समझोते केले. त्यात काँग्रेसचे मोठे नुकसान झालेले दिसते. आता तर आपण का हरलो याचा गंभीर विचार करायचा सोडून, विटी दांडूत हरलेल्या एखाद्या लहान पोरा सारखे बडे म्हणवणारे काँग्रेस नेते, ईव्हीएमला दोष देत आहेत आणि त्यातही बॅटरीचा चार्ज या विषयी हास्यास्पद विधाने करत आहेत.
राहुल गांधी हे निकालानंतर कोमात गेल्या सारखे चोवीस तास गप्प राहिले. नतंरही ट्वीटरवरून बोलताना काश्मीरमध्ये फारूख अब्दुल्ला ओमर अब्दुल्ला यांचे मोकळेपणाने अभिनंदन राहुलनी केले नाही. कारण काश्मीरमध्येही कँग्रेसला फटकाच बसला आहे. 2014 मध्ये 12 आमदारांची काँग्रेस आता फक्त सहा वर आली आहे. ओमर अब्दुल्ला यांनीही काँग्रेसला पराभवाचे सखोल परीक्षण करण्याचा सल्ला दिला तर आम आदमी पार्टीने, दिल्लीत पुढच्या चार सहा महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेस बरोबर अजिबात समझोता कऱणार नाही, असे जाहीर करून टाकले आहे.
समजावादी पार्टीने युपीतील आगामी पोटनिवडणुकांसाठी काँग्रेसा एकही जागा देणार नाही हे स्पष्ट करून सर्व दहाही जागी उमेदवार जाहीर करून टाकले आहेत. तिथे काँग्रेसला किमान तीन जागांची अपेक्षा होती. काँग्रेस जिथे बळकट आहे तिथे तुम्ही मित्र पक्षांना हिंग लावून विचारत नाही, मग आम्ही तरी तुम्हाला युपीत कशासाठी कडेवर घ्यायचे, असा अखिलेश यादवांचा कडवट सवाल आहे. हरयाणा निकालावरील सर्वाधिक झोंबणारी प्रतिक्रिया सेना उबाठाने दिली आहे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आत्ताच जाहीर करा, हे तुणतुणं वाजवले असून संजय राऊतांनी काँग्रेसला जाहीर सल्ला दिला आहे की हिंमत असेल तर स्वबळावर निवडणुका लढवून दाखवा. काँग्रेस व उबाठामध्ये मुंबईतील तसेच विदर्भातली जागांवरून झगडा सुरु आहे तो आता चव्हाट्यावर आलेला आहे.
हरयाणात जसे जाटांचे प्राबल्य होते तसेच प्राबल्य महाराष्ट्रात मराठ्यांचे आहे. तिथे जाट पंचवीस टक्के आहेत, इथे तीस ते तेहेत्तीस टक्के मराठे आहेत, असे सांगितले जाते. त्यात कुणबी किती व मराठे किती हा संशोधनाचा विषय आहे. पण आता जरांगे पाटलांचे काय होणार ? मराठ्यांच्या असंतोषाच्या धगीवर भरंवशावर भाजपाल हरवण्याचे मनसुबे रचणाऱ्या, शरद पवार व उबाठाचे काय होणार ? आणि सर्वात महत्वाचा सवाल म्हणजे नाना पटोलेंसह काँग्रेसचे नेते हे शिवसेनेच्या वाढत्या महत्वाकांक्षेंमधून मार्ग काढून महा विकास आघाडीची नौका निकालाच्या पैलतीराला कशी नेणार ?!