दहा दिवसांत ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त
साठ आरोपींना अटक
योगेश चांदेकर
पालघरः विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातून होणारी अवैध मद्याची वाहतूक, निर्मिती आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात पालघर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ४३ लाख २८ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या दहा दिवसांत ७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत सीमावर्ती राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या शेजारी जिल्ह्यांतून येणाऱ्या मद्याची वाहतूक, निर्मिती व वाहतूक साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय आंतरराज्यातील अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार आज एक लाख वीस हजार सातशे वीस रुपयांचे अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे. मद्याचे ७२ बॉक्स संबंधितांकडून ताब्यात घेतले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई दादरा नगर हवेलीचे उत्पादन शुल्क निरीक्षक रेहान तसेच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डहाणू येथील निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण, संभाजी फडतरे आदींनी केली. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक तारखेपासून दहा दिवसांत उत्पादन शुल्क विभाग भलता सक्रिय झाला असून, अवैध मद्याची वाहतूक, निर्मिती, साठवणूक आदी प्रकरणी या विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दहा दिवसांत या प्रकरणी ७७ गुन्हे दाखल झाले असून ६० जणांना अटक करण्यात आली आहे. सात वाहने जप्त करण्यात आली आहेत.
निवडणूक काळात जातीने लक्ष
उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, कोकण विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, पालघर येथील उत्पादन शुल्क विभागाचे उपाध्यक्ष बी एन भुतकर यांच्या मार्गदर्शकाखाली ही कारवाई करण्यात आली. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अन्य राज्यातून अवैध मद्य, बोगस मद्य मोठ्या प्रमाणात येत असते. विशेषतः दीव-दमणचे मद्य महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात येत असल्याने उत्पादन शुल्क विभाग कारवाईसाठी सज्ज झाला आहे.
कोट
‘विधानसभेची निवडणूक, मतदान आणि मतमोजणी या काळात राज्य उत्पादन शुल्क विभाग आंतरराष्ट्रीय कारवाया सुरू ठेवणार आहे.
– सुधाकर कदम, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पालघर