मुंबई:-नवोदित संघ, शिवमुद्रा प्रतिष्ठान यांनी शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. विशेष व्यावसायिक गटात गतविजेत्या भारत पेट्रोलियमसह इन्शोअर कोट, न्यू इंडिया एन्शो; रिझर्व्ह बँक यांनी उपांत्य फेरी गाठली. दादर(पूर्व) शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडांगणावर सुरू असलेल्या कुमार गटाच्या उपांत्य सामन्यात नवोदित संघाने काळाचौकीच्या अमर मंडळाला ४३-२६ असे सहज नमविले. पहिल्या डावात २लोण देत २४-०८ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या नवोदितने दुसऱ्या डावात सावध खेळ करीत आपला विजय साकारला. अथर्व सुवर्णा, शौर्य धुरी यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. दुसऱ्या डावात अमरच्या रोहित शिंदेने कडवी लढत देत पराभवतील अंतर कमी केले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात शिवमुद्रा प्रतिष्ठानने विजय क्लबवर ३५-१४ अशी लीलया मात केली. विशाल लाड, आर्णव हातकर यांच्या पूर्वार्धातील झंझावाती खेळाने शिवमुद्राने विजयवर ३लोण देत २८-०१ अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली. उत्तरार्धात विजयच्या आरिफ शेखने बऱ्यापैकी प्रतिकार करीत एक लोण परतविण्यात यश मिळविले. पण संघाचा पराभव टाळण्यात तो अपयशी ठरला. विशेष व्यावसायिक गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारत पेट्रोलियमने युनियन बँकेचा २६-१४ असा पराभव केला. आकाश अरसुळ, आकाश गायकवाड यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. दुसऱ्या सामन्यात इन्शोअर कोटने चुरशीच्या लढतीत २७-२२ असे नमवित आगेकूच केली. राकेश, विनीत इन्शोअर कोटकडून, तर अक्षय तावडे, सुशांत साईल मुंबई कस्टम कडून उत्कृष्ट खेळले.
रिझर्व्ह बँकेने बलाढ्य मुंबई पोलीस संघाचा प्रतिकार २४-१५ असा मोडून काढला. विश्रांती पर्यंत दोन्ही संघानी एकमेकांना अजमाविण्यात वेळ घेतल्याने गुण फलक ८-८ अशा बरोबरीत होता. नंतर मात्र रिझर्व्ह बँकेच्या तुषार शिंदे, यश राक्षेने आपला खेळ उंचावित ९गुणांनी बँकेच्या गळ्यात विजयाची माळ घातली. पोलीस संघाचा हनुमंत गर्जे एकाकी लढला. न्यू इंडिया एशोरंस् ने मुंबई पोष्टलचा प्रतिकार २४-१८ असा मोडून काढला. पूर्वार्धात ०९-११ अशा पिछाडीवर पडलेल्या न्यू इंडियाने उत्तरार्धात मात्र गतिमान खेळ करीत हा विजय साकारला. या अगोदर झालेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात मुंबई कस्टमने मध्य रेल्वेला २५-१६, न्यू इंडियाने सेंट्रल बँकेला २४-१५, युनियन बँकेने हिंदुजाला २५-१७, इन्शोअर कोटने बेस्टला ४०-२१, रिझर्व्ह बँकेने मध्य रेल्वे माटुंगा ला २२-१७, तर मुंबई पोष्टलने रुबीचा ३६-१९ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.