माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे प्रतिपादन
शहापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून शहापूर शहराची विकसित शहराकडे वाटचाल सुरू आहे. शहापूरात नागरी सुविधांसाठी विविध कामे सुरू असून, भविष्यात एक सुनियोजित शहर म्हणून शहापूरचा नावलौकिक होईल, असा विश्वास माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केला.
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांतून राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेतून शहापूरमध्ये सुमारे साडेआठ कोटींहून अधिक रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. ७ मधील जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्र, प्रभाग क्र. ११ मधील नगरपंचायत कार्यालयासमोर उद्यान, तहसील व पोलिस ठाण्याच्या आवारात हायमास्ट व स्वच्छतागृह, सोनार आळी येथे कॉंक्रिट रस्ता, भेंडी आळी येथे कॉंक्रिट रस्ता, प्रभाग क्र. १४ मधील डोंबिवली नागरी बॅंकेनजीक ओपन स्पेस वॉल कंपाऊंड बांधणे, जुना आग्रा रोड केणे आळी ते भारंगी नदीपर्यंत गटारांचे कॉंक्रिटीकरण, हायमास्ट बसविणे आदी कामांचे कपिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी भाजपाचे शहापूर विधानसभा प्रमुख अशोक इरनक, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, नगराध्यक्षा गायत्री भांगरे, उपनगराध्यक्ष विजय भगत, भाजपाचे तालुकाध्यक्ष विवेक नार्वेकर, नगरसेविका मिताली भोपतराव, योगेश महाजन, विनोद कदम, कामिनी सावंत, माजी नगरसेविका वैदेही नार्वेकर आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहापूर येथील पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभासाठी गायकवाड कुटुंबांने दानपत्रान्वये नगरपंचायतीला जमीन दिल्याबद्दल गायकवाड कुटुंबियांचे कपिल पाटील यांनी आभार मानले. तसेच या जलकुंभामुळे शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल, याबद्दल आनंद व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शहापूरच्या विकासासाठी आणखी भरीव निधी मिळेल, असा विश्वासही कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
0000
