मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप तर्फे आतापर्यंत यशस्वीपणे साकारलेल्या ९९ बुध्दिबळ स्पर्धा, ४१ कबड्डी स्पर्धा, ८६ क्रिकेट स्पर्धा, ६५ कॅरम स्पर्धा, २२ शरीरसौष्ठव स्पर्धा, २१ व्यायाम स्पर्धा, ७ खोखो स्पर्धा, ४१ क्रीडा प्रशिक्षण शिबीर आदी उपक्रमामध्ये क्रीडाप्रेमींचा मोलाचा वाटा होता. त्यामध्ये उपक्रमा अनुषंगाने बॅकस्टेज सांभाळणाऱ्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या महिला क्रीडा विभाग प्रमुख सुनिता चव्हाण यांच्या कार्याचा सहभाग देखील महत्वाचा होता. म्हणूनच आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सुनिता चव्हाण यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीचे औचित्य साधून नुकताच माजी नगरपाल व लायन्स डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सुवर्ण गौरवचिन्ह प्रदान करून क्रीडा कार्याचा सन्मान करण्यात आला. नुकतीच पार पडलेली राज्य स्तरावरील शालेय ६० मुलींची मोफत कॅरम स्पर्धा ही सुनिता चव्हाण यांच्या क्रीडा कार्याची पोचपावती ठरली.

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे मागील तीन महिन्यात झालेल्या पाचपैकी  तीन शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेत काही तांत्रिक अडचणींमुळे फक्त मुलांची स्पर्धा घेण्यात आली. त्यामुळे स्पर्धांपासून वंचित झालेल्या ३१ मुलींनी स्पर्धेसाठी जोरदार मागणी केली. परिणामी कार्यालयीन कॅरम स्पर्धेत उल्लेखनीय खेळ करणाऱ्या महिला क्रीडा विभाग प्रमुख सुनिता चव्हाण यांनी स्वतःच्या आईच्या स्मरणार्थ आयडियलमार्फत फक्त मुलींसाठी क्रीडाप्रेमी स्व. कमलाबाई कडवे स्मृती विनाशुल्क कॅरम स्पर्धा आयोजित केली. त्यांच्या सक्रीय मार्गदर्शनामुळे आरएमएमएस सहकार्यीत राष्ट्रीय स्तर गाजविणाऱ्या राज्यातील सबज्युनियर कॅरमपटूसह शालेय ६० मुलींच्या सहभागाने यशस्वी झालेली आंतर शालेय मुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा रंगली. परेल येथील स्पर्धेमध्ये सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल-पुण्याच्या तनया पाटीलने अंतिम विजेतेपद तर आर.बी. शिर्के हायस्कूल-रत्नागिरीच्या स्वरा कदमने अंतिम उपविजेतेपद पटकाविले. पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कारासह गौरविण्यात आले. केवळ मुलींसाठी चँम्पियन कॅरम सेटवर मोफत स्पर्धा आयोजित केल्याबद्दल राज्यातील पालक-शिक्षक वर्ग, खेळाडू यांनी सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक करीत मुलींच्या स्पर्धेचे सातत्य राखण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *