नवी मुंबई : श्रीगणशोत्सवाप्रमाणेच 3 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत उत्साहात संपन्न झालेल्या नवरात्रौत्सवातील विसर्जन सोहळा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 पारंपारिक विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेने केलेल्या योग्य नियोजनव्यवस्थेमध्ये सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला. महानगरपालिका क्षेत्रात 1437 घरगुती / सोसायटी मधील देवी मूर्ती  विसर्जनाप्रमाणेच 171 सार्वजनिक देवी मूर्तींचे विसर्जन असे एकूण 1608 देवी मूर्तींचे विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आले.

यामध्ये बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 112 घरगुती / सोसायटी व 20 सार्वजनिक, नेरुळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 71 घरगुती / सोसायटी व 29 सार्वजनिक, वाशी विभागातील 2 विसर्जन स्थळांवर 138 घरगुती / सोसायटी व 11 सार्वजनिक, तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 162 घरगुती / सोसायटी व 26 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 151 घरगुती / सोसायटी व 42 सार्वजनिक, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 304 घरगुती / सोसायटी व 9 सार्वजनिक, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 86 घरगुती / सोसायटी व 23 सार्वजनिक आणि दिघा विभागात 1 विसर्जन स्थळावर 413 घरगुती / सोसायटी व 11 सार्वजनिक अशा एकूण 1437 घरगुती / सोसायटी व 171 सार्वजनिक अशाप्रकारे एकूण 1688 देवीमूर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.

विशेष महत्त्वाची बाब म्हणजे यातील 48 मूर्ती शाडूच्या होत्या. या माध्यमातून गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सवातही पर्यावरणशील दृष्टिकोन जपण्यात आला.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 विसर्जन स्थळांपैकी मुख्य 14 विसर्जन तलांवांमध्ये जलप्रदूषण टाळण्यासाठी गॅबीयन वॉलची रचना करण्यात आलेली असून त्याच क्षेत्रात भाविकांनी देवीमूर्ती विसर्जन करून नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आवाहनानुसार जलाशयातील जैवविविधतेची जपणूक केली.

सर्व 22 मुख्य विसर्जनस्थळांवर अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार व श्री. शिरीष आरदवाड, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली संबंधित विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांच्यासह विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच 200 हून अधिक स्वयंसेवक, लाईफगार्ड आणि अग्निशमन दलाचे जवान विसर्जन सोहळा सुव्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी दक्ष होते.

देवी / घटांच्या सुयोग्य विसर्जनासाठी श्रीगणेशोत्सवाप्रमाणेच तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. आकाराने मोठ्या मूर्ती विसर्जित होतात अशा विसर्जन स्थळी फोर्कलिफ्टही ठेवण्यात आल्या होत्या. पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.

याशिवाय सर्व 22 मुख्य विसर्जन स्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. त्याची वाहतुक स्वतंत्र निर्माल्य वाहनाव्दारे करण्यात आली. या निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुर्भे येथील प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणाही सर्वच ठिकाणी अत्यंत सतर्कतेने कार्यरत होती. भाविकांच्या उत्तम सहकार्यामुळे नवरात्रौत्सव व देवी मूर्ती विसर्जन सोहळा शांततेत व सुव्यस्थितीत संपन्न झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *