माथेरान : माथेरान मधील जटील समस्यांना सामोरं जाता जाता इथली एक एक पिढी संपुष्टात येत आहे.परंतु माथेरानच्या स्थानिक नागरिकांना आजही अनेक प्रसंगांना तोंड देताना अक्षरशः नाकेनऊ येत असल्या तरीसुद्धा पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणारा भूमिपुत्र प्रत्येक अडचणींचा सामना करण्यासाठी नेहमीच सज्ज दिसत आहे.

रस्त्यांची दुर्दशा उघड्या डोळ्यांनी नेतेमंडळी पहात आहेत पण ते सुस्थितीत असावेत याबाबत भ्र शब्द देखील काढताना दिसत नाहीत. अत्यावश्यक सेवासुविधाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. पर्यटन वाढीसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी पाठपुरावा करण्यास असमर्थता दिसून येत आहे.वीज, पाणी प्रश्नांची उकल केली जात नाही की, घाटरस्त्यात सुट्ट्यांच्या हंगामात होणारी नित्याचीच वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही.यामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे.वाढत्या महागाई मध्ये सर्वसामान्य नागरीक कशाप्रकारे आपल्या कुटुंबाला आधार देत आहे.पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांना समस्या आणि  अडचणींवर मात करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.याबाबत काडीचेही सोयरसुतक नसल्याप्रमाणे नेतेमंडळी वावरताना दिसत आहेत. कारण त्यांच्याकडे नगरपरिषदेच्या सभागृहातील नगरसेवक, नगराध्यक्ष पद नाही याचं एकमेव कारणास्तव ही नेतेमंडळी आजही मूग गिळून गप्प बसले आहेत.

ज्यांनी ज्यांनी अनेक दशकांपासून एखाद्या बंगल्याचे माळी काम पाहिले आहे त्यांचे जीवन म्हणजे एकप्रकारे तुरुंगवासच आहे. एखादं अपवाद वगळता बऱ्याच माळी कामगारांना पुरेसा पगार दिला जात नाही आणि मुळात काही बंगल्यांचे मालक त्यांच्या वास्तुकडे ढुंकूनही पहात नाहीत अशा परिस्थितीत वीज बिल,पाणी बिल असो किंवा काही किरकोळ दुरूस्तीची कामे असोत त्या माळ्याला स्वतःच्या खिशातून करावी लागत आहेत.गावातील ही नेतेमंडळी पदाशिवाय कामे करत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नगरपरिषदेच्या प्रशासकीय राजवटीत आपल्या व्यथा कुणासमोर कथन कराव्यात या विवंचनेत भूमिपुत्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *