मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूकीची घोषणा झाली असून या निवडणूकीसाठी सुट्टीचे दिवस वगळता उमेदवाराला फक्त ६ दिवसच मिळणार असल्याने उमेदवार आणि पक्षाचेही टेन्शन वाढले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २२ ऑक्टोबरला सुरू होणार असून अर्ज भरण्याची मुदत २९ ऑक्टोबरला संपणार आहे. म्हणजेच, अर्ज भरण्यासाठी आजपासून फक्त १४ दिवस उरले आहेत. त्यामध्येही तारखा आणि सुट्ट्यांचा विचार करता दिवस कमी मिळतात. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची धावपळ होणार हे नक्की. दरम्यान, ३० नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे, २२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत सुट्ट्यांचे दिवस वगळता अर्ज भरण्यासाठी केवळ ६ दिवसच उमेदवारांकडे असणार आहेत
नांदेड पोटनिवडणुकीचीही तारीख ठरली
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं होतं. त्यामुळे, येथील मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांप्रमाणेच लोकसभा पोटनिवडणुकांचंही वेळापत्रक असणार आहे. त्यानुसार, २० नोव्हेंबर रोजी मतदान व २३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान व निकाल जाहीर होईल.
