आचारसंहीतेपुर्वी घाईघाईत शपथवीधी

स्वाती घोसाळकर

 

मुंबई : विरोधकांचा टोकाचा विरोध, न्यायालयात सुरु असलेला खटला या सगळ्याला बाजूला करीत महायुतीने आज राज्यपाल नियुक्त १२ पैकी ७ जागांवर आपल्या नेत्यांना शपथ दिली. यात भाजपाच्या फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पंकज भुजबळ आणि शिंदेगटाच्या मनिषा कायंदे यांचाही समावेश आहे. १२ पैकी ज्या ७ जागांसाठी शपथविधी झाला त्यात भाजपाच्या तीन, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या २ जागांचा समावेश आहे.

निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यापुर्वीच घाईघाईत राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी सोहळा आज दुपारी विधानभवनात पार पडलाय. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या आमदारांना शपथ दिलीय. राज्य विधान परिषदेत राज्यपालांच्या कोट्यातील १२ आमदारांची पदे चार वर्षांहून अधिक काळापासून रिक्त होती. ६ नोव्हेंबर २०२० ला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना १२ उमेदवारांची यादी पाठवली होती, परंतु आजपर्यंत त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. तत्कालीन राज्यपाल कोश्यारीही निवृत्त झाले आणि त्यांच्यानंतर राज्याचे राज्यपाल झालेले रमेश बैस यांनीही यावर कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. राज्यपालांनी नियुक्त केलेल्या 12 आमदारांच्या रिक्त पदांबाबत उच्च न्यायालयात खटला प्रलंबित आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूरचे प्रमुख सुनील मोदी यांच्या याचिकेवर हायकोर्टाने सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता. मोदींनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधी प्रकरणात तातडीने निर्णय देण्याच्या उच्च न्यायालयाकडे मागणी केली होती, परंतु उच्च न्यायालयानं त्यास नकार दिलाय. त्यामुळे हा शपथविधी पार पडला. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी विधान परिषदेवर नियुक्ती केलेल्यामध्ये भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा किशोर वाघ, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पोहरा देवी येथील धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, पंकज छगन भुजबळ, इद्रिस इलियास नायकवडी, माजी खासदार हेमंत श्रीराम पाटील, डॉ. मनीषा कायंदे यांच्या नावांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नियुक्त्या करणे अपेक्षित असते. परंतु आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास अगोदर राजकीय क्षेत्रातील नेत्यांची या जागेवर वर्णी लावल्या कारणाने विरोधकांनी राज्यपालांवर टीकेची झोड उठवली आहे.

विधानपरिषदेत महायुतीचे संख्याबळ ४१

राज्यपाल नियुक्त 7 आमदारांची वर्णी लागल्यावर विधान परिषदेमध्ये महायुतीचं संख्याबळ आता वाढलंय. यामध्ये राज्यपाल नियुक्त तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर पाठवायच्या जागांचा समावेश आहे. महायुतीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांसह आता महायुतीचे संख्याबळ ४१ झालंय. तर महाविकास आघाडीचे संख्याबळ १७ आहे. आता ७ सदस्यांच्या नियुक्तीनंतरसुद्धा 20 जागा रिक्त असणार आहेत.

PHOTO CATION

आमदारम्हणून शपथघेतल्यानंतर चित्रा वाघ यांचे अभिनंदन करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *