नवी मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
कोकण विभागाचे मराठी भाषा संचालनालय, विभागीय माहिती कार्यालय आणि विभागीय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी मुंबई व कोकण विभागीय सहाय्यक भाषा संचालक योगेश शेट्ये, एम.डी.शहा महिला महाविद्यालयाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.राजाराम जाधव, प्रा.डॉ.किशोर देसाई, प्रा.राजेंद्र शिंदे, कोकण विभागाच्या सहायक संचालक श्रीम.संजीवनी जाधव, उपसंपादक प्रविण डोंगरदिवे, भाषा संचालनालयाचे अधीक्षक विजय हसुरकर तसेच कोकण भवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी कोकण भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या प्रांगणात विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि.16 ऑक्टोंबर,2024 पर्यंत राहणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 अशी आहे.
वाचन प्रेरणादिनानिमित्त आज भाषा संचालनालयामार्फत पुस्तक अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी डॉ.गणेश मुळे, प्रा.डॉ.राजाराम जाधव, प्रा.डॉ.किशोर देसाई, प्रा.राजेंद्र शिंदे या मान्यवरांनी अभिवाचन केले.
भाषा संचालनालयामार्फत प्रकाशीत करण्यात आलेल्या विविध प्रकाशनांचा समावेश या पुस्तक प्रदर्शनात करण्यात आला आहे. कोकण भवनात येणारे नागरीक आणि विशेषत: कोकण भवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पुस्तक प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी. असे आवाहन मुंबई व कोकण विभागीय सहाय्यक भाषा संचालक योगेश शेट्ये यांनी यावेळी केले.