नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी अखेर केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. राहुल गांधीनी लोकभेत दोन मतदार संघातून विजय मिळवल्यानंतर वायनाडच्या खासदारीकीचा राजीनामा दिला होता. येथे होत असलेल्या पोटनिवडणूकीसाठी प्रियांका यांना पक्षाने तिकीट दिले आहे.
प्रियांका गांधी यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल. निवडणूक आयोगाने १३ राज्यांतील ४७ विधानसभा आणि २ लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी यूपीच्या वायनाड आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी रायबरेली ही गांधी घराण्याची पारंपारिक जागा निवडली होती आणि वायनाड सोडले होते. केरळमध्ये विधानसभेच्या दोन जागांवरही पोटनिवडणूक होत आहे. पक्षाने दोन्ही जागांसाठी उमेदवारही जाहीर केले आहेत.
१७ जून रोजी वायनाडची जागा सोडताना राहुल म्हणाले होते की, माझे वायनाड आणि रायबरेलीशी भावनिक नाते आहे. मी गेली ५ वर्षे वायनाडचा खासदार होतो. मी लोकांचे प्रेम आणि समर्थन यासाठी आभारी आहे. प्रियंका गांधी वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवतील, पण मी वेळोवेळी वायनाडलाही भेट देणार आहे. रायबरेलीशी माझा प्रदीर्घ संबंध आहे, मला पुन्हा त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल याचा मला आनंद आहे, पण हा निर्णय कठीण होता.
राहुलच्या घोषणेनंतर प्रियांका म्हणाल्या होत्या की, वायनाडचे प्रतिनिधित्व करताना मला खूप आनंद होईल. त्यांची (राहुल गांधी) अनुपस्थिती मी त्यांना जाणवू देणार नाही. मी मेहनत करीन. प्रत्येकाला खूश करण्याचा आणि चांगला प्रतिनिधी होण्याचा माझा प्रयत्न असेल. रायबरेली आणि अमेठीशी माझे खूप जुने नाते आहे, ते तोडता येणार नाही. रायबरेलीतही मी माझ्या भावाला मदत करेन. आम्ही रायबरेली आणि वायनाड या दोन्ही ठिकाणी उपस्थित राहू.
