मुंबई – आगामी विधानसभा निवडणूकीत दगाफटका होऊ नये म्हणून बंडोबांना थंड करण्यासाठी तब्बल २७ महामंडळांवर सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांची घाऊक भरती करण्यात आली आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच स्थापन केलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशिष दामले तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी तुषार पवार व बापू भेगडे यांची निवड करण्यात आली आहे.

राज्य सरकारने राज्यातील 27 महामंडळांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य म्हणून अनेकांना संधी दिली आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या राजी-नाराजी नाट्यापूर्वीच अनेकांचं बंड थमवण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. त्यामध्ये, महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळाच्या अध्यक्षपदी भाजप नेते प्रशांत परिचारक यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून प्रशांत परिचारक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याची चर्चा रंगली आहे.

राज्य सरकारने याच महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले होते, त्यामध्ये विविध महामंडळांच्या निर्माणाची घोषणा केली होती. त्यात, परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 3 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय (नियोजन विभाग) कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 8 मधील तरतुदीनुसार करण्यात आली होती. त्यानुसार आज आशिष दामले यांची निवड करण्यात आली तर तुषार पवार आणि बापू भेगडे यांची महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983 मधील कलम 12 (2)(ब)मधील तरतुदीनुसार संदर्भ क्र. 1 अन्वये ही निवड करण्यात आली आहे. दरम्यान, महामंडळावर निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले आहे. तर, पंढरमधून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या प्रशांत परिचारक यांना सहकार कृषी पणन महामंडळाच्या अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *