आंबेडकरवादी संघटनांचा सूर

मुंबई : निवडणुकीत ‘स्वबळावर लढत ‘ आणि ‘ तिसरी आघाडी ‘ हे दोनही पर्याय आंबेडकरवादी राजकारणासाठी निरुपयोगी आहेत, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि त्याद्वारे राज्यसभेत भाजपला बहुमत मिळू न देण्यासाठी तत्वतः  महाविकास आघाडीला साथ देण्याची भूमिका अनेक आंबेडकरवादी पक्ष – संघटनांची जरूर आहे.
मात्र अधिकृत संवादाशिवाय आणि प्रतिनिधीत्व, सत्तेत भागीदारी न देताच राज्यातील बौद्ध समाजाचा पाठिंबा गृहीत धरण्याची महाविकास आघाडीच्या धुरिणांची मानसिकता स्पष्ट होवू लागली आहे. परिणामी:  लोकसभा निवडणुकीपाठोपाठ  विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला एकतर्फी आणि बिनशर्त पाठिंबा देण्याबाबत आंबेडकरी समाजात नाखुषीची भावना वाढू लागली  आहे. त्यामुळे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती घडण्याची खात्री कुणीही देवू शकत नाही.
हा सूर मुंबईत फोर्ट भागात सोमवारी  झालेल्या आंबेडकरवादी पक्ष – संघटनांच्या एका बैठकीतून निघाला आहे. या बैठकीला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने, पँथर नेते सुरेश केदारे, रिपब्लिकन पक्ष ( खोब्रागडे) चे प्रदेशाध्यक्ष भाऊ निरभवणे, रामविलास पासवान यांच्या दलित सेनेचे नेते रवी गरुड, प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, विदर्भातील ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद पखाले, प्राचार्य रमेश जाधव, प्रा. एकनाथ जाधव, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, सतीश डोंगरे, ॲड. जयमंगल धनराज आदी उपस्थित होते.
वास्तवाचे भान ठेवा
लोकसभा निवडणुकीतील भाजप – एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यातील मतांच्या टक्केवारीचा फरक हा केवळ एक – दीड टक्क्याचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होवू नये, अशी आमची इच्छा आहे. मात्र तसे घडू द्यायचे नसेल तर महाविकास आघाडीनेही वास्तव परिस्थितीचे भान ठेवावे, असे आवाहन बैठकीनंतर  उपस्थित नेत्यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
मते लुटण्याचे मनसुबे ?
राज्यात बौद्ध समाजाची लोकसंख्या ही सुमारे १ कोटी इतकी असून  विधानसभेच्या १८९ जागांवर प्राबल्य आहे.असे असतांनाही त्या समाजाला सत्तेत कोणतीही भागीदारी न देता मतांची लयलूट करण्याचे मनसुबे कितपत योग्य आहेत, असा सवाल महाविकास आघाडीला बैठकीतून करण्यात आला आहे.
छोट्या पक्षांना सोबत घ्या
विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तेचे लक्ष्य चुकवायचे नसेल तर छोट्या मोठ्या परिवर्तनवादी पक्षांना सन्मानाने सोबत घेण्याची भूमिका महाविकास आघाडीने घेण्याची गरज आहे, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
महाविकास आघाडी स्वप्न रंजनात दंग
महाविकास आघाडी ही आंबेडकरवादी पक्ष – संघटनांबरोबरच डाव्या, पुरोगामी छोट्या पक्षांनाही दूर लोटतांना दिसत आहे. त्यावरून आघाडीच्या नेत्यांना मुख्यमंत्री म्हणून आरशात स्वतःचाच चेहरा दिसू लागला आहे.  ते सारे मंत्रिपदाच्या शपथविधि सोहळ्याच्या स्वप्न रंजनात दंग झाले आहेत, असे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
अनेकरंगी लढतींना आघाडीच जबाबदार
महाराष्ट्रात समविचारी मित्र पक्षांना सोबत न घेतल्यामुळे राज्यात मतविभागणी करणाऱ्या अनेकरंगी लढती झाल्या तर त्याला महाविकास आघाडीच सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी दिला आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *