भाईंदर : मेमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी मिरा-भाईंदर मतदारसंघात मतदारांची संख्या तब्बल ६८ हजारांनी वाढली आहे. या मतदारसंघात आता पाच लाख सात हजार ५४२ मतदार झाले आहेत.

पुढील महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. त्यानुसार मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या १५ ऑक्टोबरपर्यंत पाच लाखांवर पाेहाेचली आहे. त्यात पुरुष मतदारांची संख्या दाेन लाख ६६ हजार २३५ आणि स्त्री मतदारांची संख्या दाेन लाख ४१ हजार २१३ आहे. लोकसभा निवडणुकीत मिरा-भाईंदर मतदारसंघात चार लाख ३९ हजार २८३ मतदार होते. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील मतदारांची संख्या चार लाख ३६ हजार ४२६ होती.

 

विधानसभा निवडणुकीसाठी मिरा-भाईंदर मतदारसंघात सुमारे ४८९ मतदान केंद्रे असणार आहेत. त्यासाठी ४८९ मतदान यंत्रे व तेवढीच मतदान यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. व्हीव्हीपॅट यंत्रांची संख्या ६३६ असणार आहे. मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील भुताळे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कार्यालय भाईंदर पश्चिम येथील अतिरिक्त तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीत तळमजल्यावर असणार आहे. निवडणुकीची मतमोजणी भाईंदर पूर्व येथील स्व. प्रमोद महाजन सभागृहात पार पडणार आहे.

ज्येष्ठांना घरबसल्या मतदानाची सुविधा

गेल्या पाच महिन्यांत त्यात ६८ हजार १६९ मतदारांची भर पडली. या वेळी नवमतदारांची संख्या ११ हजार ३२८ आहे. पाच हजार ६१ मतदार ८५ वर्षांवरील आहेत, त्यांना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *