अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला जामीन ० संतप्त कुटुंबीयांचा ठिय्या आंदोलन ० मनसे आक्रमक

अनिल ठाणेकर

ठाणे : ठाण्यात संतापजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पदाधिकारी असणाऱ्या आरोपीला जामीन दिल्यामुळे जमाव संतप्त झाला होता. मुलीच्या पालकांसहीत ठाण्यातील शेकडो महिलांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन करीत आक्रोश व्यक्त केला. चिमुकलीसोबत गैरवर्तन करणारा हा वासनांध आरोपी शिंदे गटाचा उपविभागप्रमुख असून सचिन यादव असं त्याचं नाव आहे. या घटनेनंतर ठाण्यातील मनसे आक्रमक झाली असून योग्य ती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडू असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी जाहिर केले आहे.

ठाण्यातील भंडार आळी भागात एका ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य करण्यात आलं. याप्रकरणात आरोपी शिंदे गटाच्या उपविभागप्रमुखाने सचिन यादव (५५) याच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र विनयभंगाच्या आरोपीला जामीन मिळालाच कसा? असा सवाल लाडक्या बहिणींनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. आरोपीला जामीन मंजूर झाल्यानंतर ठाण्यात पीडितेच्या आई-वडिलांसह शेकडो महिलांनी ठिय्या आंदोलन केलं. तसेच, शिंदे गटाच्या उपविभागप्रमुखाला तत्काळ अटक करा, अशी मागणी मनसेचे पदाधिकारी आणि मुलीच्या पालकांनी केली आहे.

ठाण्याच्या स्टेशन परिसरातील भंडार आळीत राहणारी ही मुलगी क्लासला जात असताना शिंदे गटाचा उपविभागप्रमुख असणाऱ्या सचिन यादवयाने त्या मुलीला इमारतीमध्ये गाठत विनयभंग केला. त्यावेळी घाबरलेल्या पीडित तरुणीनं त्या नराधमाला लांब ढककलं. त्यानंतर संतापलेल्या सचिन यादवने अश्लील भाषेत तीला धमकावले. पीडित तरुणीनं आपल्यासोबत झालेला प्रकार तात्काळ कुटुंबियांना सांगितला. या घटनेची गंभीर दाखल घेत पीडितेच्या कुटुंबियांनी थेट ठाणे नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी या वासनांधला अटक देखील केली.

विशेष म्हणजे, विनयभंग करणाऱ्या आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या वासनांधला एकाच दिवसांत जामीन मंजूर होतोच कसा? असा सवाल मनसे नेते अविनाश जाधव आणि पीडीत मुलीच्या आई-वडिलांनी करीत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीला पुन्हा अटक करण्याची मागणी केली.

एकीकडे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर आणि या आरोपीला पोलिसांकडून वेगळा न्याय का? असा संतप्त सवाल महिलांनी विचारला आहे. दरम्यान, पीडित मुलीच्या कुटुंबियांना धमक्यांचं सत्र सुरू झालं आहे. तक्रार मागे घ्या अन्यथा तुमचं वाईट करू, अशा धमक्या पीडितेच्या कुटुंबियांना आल्यात. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबियांसोबत आंदोलन केले. जर दोन दिवसांत त्या वासनांदला अटक केली नाही तर, भंडार आळीपासून ते मासुंदा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही कॅन्डल मार्च काढू, असं यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *