नवी दिल्ली : सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी त्यांच्यानंतर सरन्यायाधीश पदाची जबाबदारी न्यायमूर्ती खन्ना यांच्याकडे दिली जावी, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारला लिहिलं आहे. चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर २०२४ नंतर समाप्त होणार आहे. दरम्यान, न्यायामूर्ती खन्ना हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असल्याने त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. न्यायमूर्ती खन्ना हे २५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर महाराष्ट्राचे मराठमोळे न्यायाधिश भूषण रामकृष्ण गवई यांची सरन्यायाधिशपदी नेमणूक होईल.
डी वाय चंद्रचूड १३ मे २०१६ रोजी पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनले होते. न्यायमूर्ती खन्ना हे १८ जानेवारी २०१९ मध्ये पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनले आहेत. यापूर्वी न्यायामूर्ती खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयातही न्यायाधीश म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीच्या अधिकृत माहितीनुसार, जस्टीस खन्ना १३ मे २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. अशात त्यांनी नोव्हेंबरमध्ये पदभार स्वीकारला तर ते सहा महिन्यानंतर निवृत्त होणार आहेत. जस्टीस खन्ना यांच्यानंतर न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचे नाव सरन्यायाधीश पदासाठी चर्चेत आहे. ते मे 2025 मध्ये सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारु शकतात. शिवाय महत्त्वाची बाब म्हणजे ते अनुसूचित जाती प्रवर्गातील दुसरे सरन्यायाधीश असतील. न्यायामूर्ती केजी बालकृष्ण यांच्या रूपाने देशाला पहिल्यांदा दुसरे दलित सरन्यायाधीश मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
