रमेश औताडे

मुंबई : निव़डणूका जाहिर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपासाठी जोरदार घमासान सुरु आहे. पण महाविकास आघाडीत या जागावाटपावरून बिघाड असल्याचे आज जाहिरपणे दिसून आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात जोरदार खटके उडाले असून त्याचा प्रत्यय महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतही दिसून आला. काँग्रेसच्या हाताला मशालीचे चटके बसू लागल्याची मिश्कील प्रतिक्रीया राजकीय वर्तुळात त्यामुळे उमटली.

नाना पटोले यांनी विदर्भात शिवसेनेला जागा न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जागावाटपाच्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये खटके उडाले. त्यामुळे जागा वाटपाची चर्चा पुढे जात नसल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिके विरोधात थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने लवकरात लवकर जागा वाटपाचा निर्णय व्हावा असा प्रयत्न महाविकास आघाडी करत असताना नाना पटोले यांची भूमिका अडचणीचे असल्याचं ठाकरेंच्या नेत्यांनी म्हटलं आहे. लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा सुटण्यासाठी मी आज राहुल गांधी यांच्याशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटले होते. काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी माझं बोलणं झालं असून महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबतही सुद्धा माझं बोलणं झालं आहे. आम्ही रामटेकसारखी सहा वेळा निवडून आलेली जागा काँग्रेसला दिली. अमरावतीची सुद्धा जागा आम्ही दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या जागा आम्ही दिल्या त्या जिंकल्या सुद्धा आहेत. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. त्यामुळे विधानसभेला आम्हाला अधिक जागा मिळायला हव्यात हे समजून घ्यायला हवं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शेकापही नाराज

शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीत सन्मानजनक वागणूक मिळत नसेल तर बाहेर पडण्याची भूमिका जाहीर केली. महाविकास आघाडीत सांगोला विधानसभेची जागा शेकापच्या वाट्याला असताना देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दीपक साळुंखे यांना पक्षात घेतल्याने शेकापची नाराजी आहे. जर महाविकास आघाडीत वेगळा निर्णय घेतला जात असेल तर शेकाप आपला उमेदवार देणार असे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *