९५ टक्के महिला मतदारांचे योजनेसाठी अर्ज, ७९ हजार अपात्र
हरिभाऊ लाखे
नाशिक : लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ ऑक्टोबरला संपली असून, जिल्ह्यात एकूण १५ लाख ७४ हजार ४०९ बहिणींनी दरमहा १५०० रुपयांचे अनुदान मिळावे, यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाकडे अर्ज केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. त्यापैकी ९५ टक्के म्हणजेच १४ लाख ९६ हजार अर्जदार महिला लाभार्थी ठरल्या आहेत.
राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या बँक खात्यावर दरमहा १,५०० रुपये सरकारकडून देण्यात येत आहेत. अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याने योजनेला वेळोवेळी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली. अर्ज करण्याची मुदत १५ ऑक्टोबरला संपुष्टात आली असून, जिल्ह्यात आतापर्यंत १५ लाख ७४ हजार ४०९ बहिणींचे अर्ज महिला आणि बालविकास विभागाला ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७ लाख ३८ हजार ५५६ महिलांचे अर्ज अॅपद्वारे, तर ८ लाख ३५ हजार ८५३ अर्ज पोर्टलद्वारे जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ९५ टक्के म्हणजे १४ लाख ९६ हजार अर्ज मंजूर झाले असून, ७९ हजार अर्ज निकषात बसत नसल्याने अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अद्याप ओसरेना पोस्टातील गर्दीचा जोर
लाडकी बहीण योजनेची प्रवेशप्रक्रिया आता संपुष्टात आली असली तरीही या योजनेशी संबंधित इतर प्रलंबित कामांसाठी अद्याप लाभार्थी महिलांचा टपाल कार्यालयाला गराडा पडला आहे. जनरल पोस्ट ऑफिससह विविध उपनगरांमधील कार्यालयांमधील टपाल गजबजलेले वातावरण या गर्दीमुळे कायम आहे. लाडकी बहीण योजनेस सुरुवात झाल्यापासून दुर्लक्षित असणाऱ्या टपाल कार्यालयांमध्ये महिलांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर रांगा लागेपर्यंत या गर्दीत वाढ झाली.
टपाल विभागात या योजनेच्या खात्यावर लवकर पैसे जमा होत असल्याच्या वृत्ताने गेल्या दोन-तीन महिन्यांत पोस्टल बँकेत लाखो महिलांनी नव्याने खाते सुरू केले आहे. आता दिवाळसण तोंडावर आहे. यामुळे खात्यात जमा झालेले आतापर्यंतचे पैसे काढण्यासह खात्याची केवायसी करणे, आधार लिंकिंग, पॅन क्रमांक लिंकिंग, निवासी पत्त्यातील बदल आदी कारणांसाठी अद्याप प्रक्रिया सुरू असल्याने कर्मचाऱ्यांना दिवसभर उसंत नाही. ज्या लाभार्थी महिलांचे यापूर्वी कुठेही खाते नव्हते, अशा महिलांनीही प्राधान्याने पोस्टात खाते उघडले आहे.