अनिल ठाणेकर
ठाणे : आपल्या तिखट आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याची जगप्रसिध्द तिखट मामलेदार मिसळवर आडवा हात मारला. इतकेच नव्हे तर आज ठाण्यात मनोसोक्त खाऊगिरी करीत प्रशांत कॉर्नरच्या पाणीपुरीचाही आस्वाद लुटला.
ठाण्यातली मामलेदार मिसळ ही राज ठाकरेंची आवडती मिसळ आहे. राज ठाकरे ठाण्यात आल्यावर मामलेदार मिसळचा आस्वाद घेतातच. ठाण्यात जिथे असतील तिथे पार्सल तरी मागवतात. आज राज ठाकरेंनी पत्नी शर्मिला ठाकरेंसह मामलेदार मिसळ खाल्ली. त्यांच्यासह अभिनेते आणि फूड व्ह्लॉगर कुणाल विजयकरही होते.
त्यानंतर प्रशांत कॉर्नर या ठाण्यातल्या पाचपाखाडी या ठिकाणी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी पाणी पुरीचा आस्वाद घेतला.
000
प्रशांत कॉर्नरच्या मिठाईत केस ;
भाजपाच्या अर्चना पाटीलांचा आरोप
ठाण्यात ज्या प्रशांत कॉर्नरच्या ब्रँडच्या पाणीपूरीचा आस्वाद राज ठाकरेंनी लुटला त्याच प्रशांत कॉर्नरच्या आनंदनगर येथील दुकानातील स्नॅक्स व मिठाईत केस व कागद सापडले असल्याचा दावा भाजपा ओवळा माजिवडा मंडळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. अर्चना भूषण पाटील यांनी केला आहे. राज ठाकरे पाणी पुरीला गेले असतानाच भाजपाच्या अर्चन भूषण पाटील यांनी हे आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाण्यातील प्रसिद्ध प्रशांत कॉर्नरच्या आनंदनगर येथील दुकानातून तीन महिन्या अगोदर चकलीचे पॅकेट घेतले होते त्याच्यामध्ये छोटे केस सापडले होते. त्यानंतर तीन दिवसाअगोदर मी कचोरी घेतली होती त्याच्यामध्ये देखील केस सापडला होता. तर मिठाईत कागद सापडले होते. तक्रार करुनही कोणताही कॉल किंवा मेसेज प्रशांत कॉर्नरकडून आलेला नाही. प्रशांत कॉर्नरचे व्यवस्थापन हे ग्राहकांना गृहीत धरून व्यवहार करीत आहे असा आरोप अर्चना भूषण पाटील यांनी केला आहे.