ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 4 मध्ये
ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांमार्फतही जनजागृती केली जात आहे. 149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील घोलाई नगर येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 4 मध्ये निवडणुक जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही निवडणुकीचे महत्व कळावे व त्यांनी त्यांच्या माध्यमातून घरातील पालक, शेजारी, मित्रपरिवार यांना मतदान करण्यास प्रवृत्त करावे यासाठी शाळा क्र. 4 मध्ये चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या सर्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “वोट फॉर बेटर इंडिया, आपले मत अमूल्य आहे, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा”अशा प्रकारची घोषवाक्य विद्यार्थ्यांनी लिहून मतदानाचा संदेश दिला. तसेच चित्रकला व रांगोळीच्या माध्यमातून मतदानाबाबतची जनजागृती विद्यार्थ्यांनी केली.
या स्पर्धांबरोबरच परिसरात विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी विविध मंडळांच्या भेटी घेवून नागरिकांशी संवाद साधला. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्वीपचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.
00000
