ठाणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सरू आहे, तर दुसरीकडे लोकशाहीच्या या उत्सवासाठी जिल्हा प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. त्यानुसार नुकतेच जिल्हा प्रशासनाकडून १८ विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची आकडेवारी जाहीर केली आहे.
यात मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५० हजार ९३ इतक्या मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे ही वाढलेली मतदार नोंदणी कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राबवलेल्या निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या संख्येत वाढ होऊन जिल्ह्यातील मतदारांची संख्या ६८ लाख एक हजार २४४ वर पोहोचली आहे. त्यानंतरदेखील आयोगाच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला होता. या कार्यक्रमांतर्गत मतदारांनी मतदान नोंदणीकडे भर दिल्याने चार लाख ७८ हजार ८९१ नवीन मतदारांची वाढ झाल असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत ७१ लाख ५५ हजार ७२८ इतके मतदार आहेत. त्यात ३८ लाख १३ हजार २६४ पुरुष, ३३ लाख ४१ हजार ७० महिला, १३९४ इतर मतदार आहेत. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या एक लाख ६५ हजार ५९७ इतकी आहे. अपंग मतदारांची संख्या ३७ हजार ८५४ इतकी, तर ८५ पेक्षा जास्त वयोगटातील मतदारांची संख्या ५७ हजार २०९ इतकी आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे पाच लाख ४० हजार २९३ मतदार आहेत, तर उल्हासनगर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच दोन लाख ८० हजार ८५२ इतके मतदार असल्याची नोंद केली आहे.
सर्वाधिक मतदार मिरा-भाईंदर मतदारसंघात वाढल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात चार लाख ५७ हजार ३५९ इतके मतदार होते, तर त्यात ५० हजार ९३ ने वाढ झाल्याने मतदार संख्या पाच लाख सात हजार ४५२ वर पोहोचली आहे.
महिला मतदारांची सर्वाधिक नोंद
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या मतदार आकडेवारीत महिला मतदारांच्या संख्येत दोन लाख ६० हजार ८५६ ने वाढ झाल्याने महिला मतदारांची संख्या ३३ लाख ४१ हजार ०७० इतकी पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *