ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ज्या ज्या भागात 50 टक्क्यापेक्षा कमी मतदान झाले होते, त्या ठिकाणचा आढावा घेवून मतदान केंद्र क्र. 155, 165, 168 या ठिकाणी मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.
कोपरी पाचपाखाडी परिसरातील शांतीनगर परिसरातून मतदानास कमी प्रतिसाद मिळाला होता. त्या अनुषंगाने येत्या विधानसभा निवडणुकीत नागरिकांना आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकार बजावावा व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीपच्या माध्यमातून या परिसरात जनजागृती करण्यात आली. यावेळी या परिसरातील नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. आपले मत किती अमूल्य आहे याची माहिती देण्यात आली.
या जनजागृती कार्यक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली व मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास स्वीपचे सर्व सदस्य उपस्थित होते.
