अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे विधानसभेवर हॅटट्रीक करण्यासाठी आमदार संजय केळकर सज्ज झाले आहेत. रविवारी भाजपच्या पहिल्या यादीत आ. संजय केळकर यांची वर्णी लागताच गेल्या अनेक दिवसांपासुन सुरू असलेल्या वावड्यांना अखेर पुर्णविराम मिळाला. आ. केळकर यांची उमेदवारी जाहिर होताच महायुतीतर्फे भाजपच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात ढोल – ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. दरम्यान, पुन्हा ठाण्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याने आ. केळकर यांनी शक्तीस्थळावर नतमस्तक होऊन धर्मवीर आनंद दिघेंना अभिवादन केले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, परिवहन सदस्य विकास पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाणे शहर विधानसभा मतदार संघ बहुभाषिक असला तरी आ. संजय केळकर हे स्वच्छ प्रतिमेचे सर्वसमावेशक नेतृत्व असल्याने २०१४ आणि २०१९ साली भाजपच्या तिकिटावर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. आता २०२४ च्या निवडणुकीसाठीही पक्षाने पुन्हा एकदा आ. केळकर यांच्यावरच विश्वास दर्शविल्याने या खेपेला आ. केळकर हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आ. केळकर यांना तिकिट जाहिर होताच रविवारी भाजपच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयाबाहेर भाजप व महायुतीच्या नेते व कार्यकर्त्यांनी ढोल – ताशांचा गजर करीत फुलांचा वर्षाव करून जल्लोष केला. याप्रसंगी, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघूले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, मा. नगरसेवक सुनेश जोशी, हाऊसिग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील,भाजप ठाणे शहर महिला अध्यक्षा स्नेहा पाटील, उपाध्यक्ष महेश कदम, सरचिटणीस विलास साठे, सचिन पाटील, भाजप स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
लोकसभेप्रमाणे ठाण्याचा गड
महायुतीच जिंकेल – केळकर
अभिनव भारत तसेच विकसित ठाणे घडवायचे असेल तर महायुती शिवाय पर्याय नाही. ठाण्याची जनता सुज्ञ आहे, सर्वपक्षियांसह ठाणेकरांचे असंख्य हात माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे विजयाची चिंता वाटत नाही, लोकसभे प्रमाणेच ठाण्याचा हा गड महायुतीच जिंकेल.असा विश्वास व्यक्त करून आमदार संजय केळकर यांनी, पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व केंद्रीय नेत्यांचे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीचे आभार मानले आहेत.
