नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूकची माहिती नागरिकांमध्ये प्रसारित करण्यासाठी व नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार कर्तव्य भावनेने बजावावा याकरिता विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. या अनुषंगाने ‘मतदार जागरुकता व सहभाग कार्यक्रम अर्थात स्वीप’ अंतर्गत मतदान करण्याचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घणसोली व कोपरखैरणे भागात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये कोपरखैरणे येथील एफ.जी.नाईक महाविदयालयातील विदयार्थ्यांची मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. 500 हून अधिक महाविदयालयीन विदयार्थी, विदयार्थिंनींनी मतदानाचा संदेश देणारे फलक उंचावत, घोषणा देत 20 नोव्हेंबरला मतदान करण्याचा संदेश प्रसारित केला.
घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् या ठिकाणी वर्गांमध्ये जाऊन विदयार्थी युवक – युवतींना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. व सक्षम लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे मतदार शपथही घेण्यात आली.
अशाचप्रकारे कोपरखैरणे गाव से-19 येथील बुध्दविहारात जमलेल्या उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देऊन मतदान करण्याचे सूचित करण्यात आले. यावेळी मतदार शपथ घेण्यात आली तसेच मतदानविषयक संकल्पपत्रेही भरून घेण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्वीप अंतर्गत व्यापक प्रमाणात जनजागृती करीत आहे. नमुंमपा क्षेत्राचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त स्वीप नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या स्वीप नोडल अधिकारी श्रीम.अभिलाषा म्हात्रे – पाटील यांच्या माध्यमातून विभाग कार्यालय पातळीवरुन या मतदार जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *