धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांची राज्याचे मुख निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांच्याकडे मागणी

 

अनिल ठाणेकर

ठाणे :‘आगामी विधानसभा निवडणुकांच्या कामकाजासाठी, अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) कर्मचाऱ्यांची, नियुक्ती करण्यात येऊ नये. जेणेकरुन, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होऊन, कर्मचाऱ्यांना अन्न आस्थापनांची योग्यपद्धतीने तपासणी करता येईल आणि पुरेशा कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेमुळे, अन्न पदार्थांमधील भेसळीला मोठ्याप्रमाणात खीळ बसेल’, असे ठाम प्रतिपादन धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी राज्याचे मुख निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांना पाठविलेल्या पत्रात केले आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) कोकण विभागाने अन्न पदार्थांबरोबरच, पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांच्या केलेल्या चाचणीमध्ये पाण्याचा एक नमुना असुरक्षित; तर, अन्नाचे काही नमुने कमी दर्जाचे असल्याची गंभीर घटना उघड झाली आहे. यासंदर्भातील धक्कादायक बाब म्हणजे, अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) कोकण विभागाकडे, अन्न-सुरक्षा अधिकारी उपलब्ध नसून, कर्मचाऱ्यांचा मोठ्याप्रमाणात तुटवडा असल्याने, प्रत्येक अन्न आस्थापनाची तपासणी करणे शक्य नसल्याचे, अन्न आणि औषध प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. एकप्रकारे हा, कायद्यातील कर्तव्यात हलगर्जीपणा करण्याचा गंभीर प्रकार असून, यामुळे अन्न पदार्थांमध्ये भेसळ अथवा गैरप्रकार करण्यास, काही भ्रष्ट-प्रवृत्तीच्या व्यावसायिकांना मोकळे रान मिळू लागले आहे. विशेष म्हणजे, निवडणुकांच्या कालावधीत, अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) कामकाज पूर्णपणे थंडावते. कारण, या विभागातील अधिकाऱ्यांवर निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात येत असते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठीदेखील, अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या असल्याची माहिती प्रकाशित झालेली असल्याने, याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांना पत्र लिहून, विधानसभा निवडणुकीसाठी, अन्न आणि औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) कोकण विभागाने, मागील सहा महिन्यांत अन्न पदार्थांचे एकूण २०९ नमुने घेतले असून, त्यातील २९ नमुन्यांच्या अहवालांपैकी, २२ अन्न पदार्थांचे नमुने हे, अत्यंत सुमार दर्जाचे आढळून आले आहेत. त्यातच आता दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे; तर, त्यानंतर महिन्याभरातच राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. अशा परिस्थितीत जर, अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) कर्मचाऱ्यांची नियुक्ती, निवडणुकांच्या कामकाजासाठी करण्यात आली तर, अन्न पदार्थांत भेसळ करणाऱ्या भ्रष्ट-प्रवृत्तीच्या व्यावसायिकांच्या हातात कोलीत दिल्यासारखे होईल आणि त्यातून विषबाधेसारख्या, जीवितास धोका उत्पन्न होणाऱ्या घटना दुर्दैवाने घडल्याशिवाय राहणार नाहीत, असे ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *