अनिल ठाणेकर
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून आज रात्री उशीरा ४५ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. पक्षातील विद्यमान जवळपास सर्वच आमदारांना पुन्हा विधानसभेची तिकीट जाहीर करण्यात आली आहे. जेथे विद्यमान आमदार खासदारकीची निवडणूक जिंकले आहेत तेथे त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महायुतीने या यादीसह उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतल्याचं चित्र आहे. नुकतेच भाजपाने ९९ जागांवर उमेदवार जाहीर केले होते. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचे काही जागांवरती शेवटपर्यंत उमेदवार ठरले नव्हते. त्यामुळे त्याचा मोठा फटका महायुतीला बसला होता. त्याच चुकीतून सावरुन महायुतीने जागावाटपाचा निर्णय घेत उमेदवारही निश्चित केले आहेत. महायुतीच्या नेत्यांमध्ये अजूनही चर्चा सुरु आहे. असं असलं तरी तीनही पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा पारंपारिक मतदार संघ कोपरी पाचपाखाडीतून निवडणूक लढविणार आहेत. विशेष म्हणजे खासदारीकीची निवडणूक जिंकणाऱ्या रविंद्र वायकर यांची पत्नी मनिषा वायकर यांनी जोगेश्वरी पुर्वमधून तिकीट देण्यात आले आहे. तर संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे यांना पैठणमधून तिकीट देण्यात आले आहे.
रत्नागिरीत उदय सामंत यांना तिकीट देण्यात आले असून त्यांचे बंधू किरण सामंत यांनाही राजापूरमधून तिकीट देण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी आजच आपला मुलगा अमित ठाकरे यांना माहीम मतदार संघातून उमेदवारी जाहिर केली होती. त्यातच आज एकनाथ शिंदे यांनीही सदा सरवणकर यांची उमेदवारी माहीम मधून जाहिर केल्याने येथे निवडणूक रंगतदार होणार आहे.
