ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू असून मतदारांना साद घालण्यात येत आहे. तर, दुसरीकडे जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा मतदारसंघनिहाय तरुण मतदारांची देखील आकडेवारी जाहीर केली आहे. या यादीत लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी ४६ हजार २७० तरुण मतदार वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक चार हजार ५०० तरुण मतदार हे मिरा-भाईंदर मतदारसंघात वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या तरुण मतदारांना साद घालण्यात कोण यशस्वी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार नोंदणी उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत चार लाख ७८ हजार ८९१ नवीन मतदारांची वाढ झाल्याने जिल्ह्यात एकूण ७१ लाख ५५ हजार ७२८ मतदार आहेत. त्यामध्ये ३८ लाख १३ हजार २६४ पुरुष, तर ३३ लाख ४१ हजार ७० महिला, अन्य मतदारांची संख्या एक हजार ३९४ आहे.
सुदृढ व बळकट लोकशाहीसाठी या प्रक्रियेत तरुणांना सामावून घेण्यात येत आहे. महाविद्यालयांमध्ये मतदान नोंदणी केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच समाजमाध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येत असून मिम्स, लोकशाहीचा भोंडला अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त युवा वर्गाला मतदार यादीत नाव नोंदणी करता यावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यास तरुणांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी तरुण मतदारांची संख्या एक लाख १९ हजार ३२७ होती. मतदार नोंदणी कार्यक्रमाला तरुणांनीदेखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने ४६ हजार २७० नी वाढ झाल्याने मतदारांची संख्या एक लाख ६५ हजार ५९७ झाली आहे.
मिरा-भाईंदरमध्ये सर्वाधिक वाढ
निवडणूक विभागाकडून राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांतर्गत सर्वाधिक तरुण मतदार मिरा-भाईंदर मतदारसंघात वाढल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात सहा हजार ८२८ मतदार होते. त्यात चार हजार ५०० ने वाढ झाल्याने मतदारसंख्या ११ हजार ३२८ वर पोहोचली आहे.
दिव्यांग मतदारांमध्येही वाढ
दिव्यांग मतदार नोंदणीमध्ये एक हजार ३३७ वाढ झाली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ३६ हजार ५१७ दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली आहे. तर, विधानसभा निवडणुकीमध्ये वाढ झाल्याने ३७ हजार ८५४ मतदार संख्या झाली आहे.
