दिवाळी निमित्त होणाऱ्या आर्थिक उलाढालीत यंदा खंड

 

 

ठाणे : दिवाळीच्या मुहूर्तावर विविध खाद्यपदार्थ, पणत्या, शोभेच्या वस्तू, विद्युत रोषणाई यांची महिला बचत गटांकडून जोरदार विक्री करण्यात येते. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तालुक्यांच्या ठिकाणी भव्य असे सरस महोत्सव भरवले जातात. यातून काही लाख रुपयांची आर्थिक उलाढाल देखील होते. मात्र यंदा दिवाळीच्या कालावधीत विधानसभा निवडणुकीचा आचार संहितेचा काळ असल्याने हे सर्व सरस महोत्सव यंदा रद्द करण्यात आले आहे. यामुळे महिला बचत गटांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांचे जाळे पसरले आहे. जिल्ह्यात सदुस्थितीत सुमारे १० हजार महिला बचत गट असून याद्वारे एक लाख महिला बचत गटांना जोडल्या गेल्या आहेत. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधीची तरतूद झाल्याने जिल्ह्यातील बचत गटांनी उभारी घेतल्याचे विविध गटांच्या उपक्रमातून दिसून येत असते. यासर्व महिला बचत गटांतर्फे पारंपरिक लघु उद्योगांना छेद देत शेती, दूध विक्री, शालेय गणवेश तयार करणे, गणेशमूर्ती तयार करणे, खत विक्री, पशू पालन यांसारख्या अनेक उद्योगांमध्ये ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गट भक्कम पणे पाय रोवत आहेत. तर दुसरीकडे पारंपरिक लघु उद्योगांची सीमा विस्तारित करून तयार केलेल्या खाद्य पदार्थाना मोठ्या स्तरावर विक्री करत महिला बचत गट उत्तम अर्थार्जन करत आहेत. दिवाळी उत्सवाच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, शहापूर येथील बचत गटांकडून मोठ्या प्रमाणात फराळ साहित्य तयार करून त्याची विक्री करण्यात येते. तसेच यामध्ये मिठाई, तूप, लोणी, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची ही मोठी विक्री करण्यात येते. तसेच दिवाळीसाठी साठी लागणाऱ्या मातीच्या आणि कृत्रिम पणत्या, आकाशकंदील, रांगोळी, रंग, तोरण यांसारख्या अनेक लहान – मोठ्या शोभेच्या वस्तू यांची बचत गटांच्या महिलांकडून मोठ्या स्तरावर विक्री करण्यात येते. मात्र यंदा सरस महोत्सव रद्द झाल्याने सर्व महिलांना वैयक्तिक स्तरावरूनच याची विक्री करावी लागणार आहे. यामुळे महिलांमध्ये काही अंशी नाराजीचे वातावरण आहे.

बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंना आणि खाद्यपदार्थांना एक हक्काची आणि शासकीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या करिता प्रत्येक दिवाळीत संपूर्ण राज्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून भव्य दिव्य असे सरस महोत्सव भरविले जातात. यामध्ये हजारो महिलांना त्यांनी तयार केलेल्या विविध फराळ, मिठाई, शोभेच्या वस्तू, कपडे यांची विक्री करता येते. तर बाहेरील महागड्या उपहारगृहांच्या तुलनेत दरात स्वस्त आणि चव अगदी घरगुती स्वरूपाची असल्याने अनेक ग्राहक बचत गटांच्या या खाद्यपदार्थाना पसंती देत असतात. यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात भरविले जाणारे सरस महोत्सव दिवाळी उत्सवाच्या काळात कायम गजबजलेले असतात तर यातून तब्बल काही लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होते. यामुळे महिलांचे उत्तम अर्थार्जन होते.

या महोत्सवाच्या माध्यमातून विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या महिला या सरकारच्या विविध योजनांच्या थेट लाभार्थी असतात. तर आचार सहिंतेच्या काळात विविध योजनांची लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रचार – प्रसार करण्यास स्थानिक प्रशासनाला निर्बंध असतात. यामुळे यंदाचे सरस महोत्सव रद्द करण्यात आले आहेत.

कोट

दिवाळी उत्सवाच्या काळात सरस महोत्सव भरविले जातात. मात्र यंदा आचार संहिता असल्याने सरस महोत्सवांचे आयोजन करण्यात आलेले नाही. मात्र नाताळ आणि नव वर्षाच्या निमित्ताने हे महोत्सव भरविण्यात येतील.- छायादेवी शिसोदे, प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद, ठाणे

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *