शर्मिला ठाकरेंची मनसे उमेदवारांकडे मागणी

 

मुंबई: शिवतीतर्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) युवा नेते अमित ठाकरे यांचं औक्षण करण्यात आलं. त्यांच्या अभिनंदनासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या वेळी मनसेच्या इतर उमेदवारांचे देखील औक्षण करण्यात आले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी खास भूमिका बजावली. त्या औक्षणाच्या वेळी बोलताना म्हणाल्या, “ओवाळणीत एक रुपयाही नको, आता आमदारकी पाहिजे!” त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
माहीम विधानसभेत थेट मुकाबला-
माहीम विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये थेट मुकाबला होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या मतदारसंघात तणाव वाढला आहे. अमित ठाकरे यांना त्यांच्या कुटुंबीयांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा आहे, तर सदा सरवणकर यांच्याकडे शिंदे गटाच्या शिवसेनेचा आधार आहे.
मनसेच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी आपली ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत विविध विधानसभांमध्ये मनसेकडून उमेदवार उभे करण्यात आले आहेत. माहीम, वरळी आणि अन्य मतदारसंघांमध्ये मनसेने थेट लढत देण्याची तयारी केली आहे. या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *