अखिल भारतीय आंतर रेल्वे खो-खो स्पर्धा
रामजीक कश्यपला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार
मुंबई : १८ वी अखिल भारतीय आंतर रेल्वे खोखो स्पर्धा बिलासपूर, छत्तीसगड येथे संपन्न झाली. या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला होता व हि स्पर्धा तीन दिवस सुरु होती. त्यामध्ये दक्षिण मध्य रेल्वे, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, उत्तर रेल्वे, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांचा समावेश होता. या स्पर्धेत रेल्वेच्या विविध भागातून १३ अधिकाऱ्यांसह ८८ खेळाडूंनी भाग घेतला होता. तर हि स्पर्धा नीट पार पाडण्यासाठी रेल्वे बोर्डाने १४ पंचांची नियुक्ती केली होती. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी रेल्वे बोर्डाने ४ निरीक्षकांची नियुक्ती केली होती.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान व गतविजेत्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूरचे कडवे आव्हान मध्य रेल्वे, मुंबईला होते. सुरवाती पासूनच अतिशय चुअराशीचा खेळ पाहायला मिळाला परंतु शेवटी मध्य रेल्वे मुंबईने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा १४-१३ असा जवळ जवळ तीन मिनिटे राखून विजेतेपदाला गवसणी घातली. या सामन्यात क्षणा-क्षणाला दोन्ही संघांची कामगिरी वरचड ठरत होती. मध्यंतरला ७-७ अशी बरोबरी पाहायला मिळाली व प्रत्येक खेळाडू “कांटे कि टक्कर” देत होता व ते आपआपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत होते.
दुसऱ्या डावात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूरला प्रथम आक्रमण करताना सहाच खेळाडू बाद करण्यात यश आल्याने मध्य रेल्वे, मुंबईला विजय नजरेच्या टप्प्यात येत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी मध्य रेल्वेच्या खेळाडूंनी जिंकू किंवा मरू या अविर्भावात संरक्षण करताना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या खेळाडूंच्या तोंडाला फेस आणला. एक एक गुण मिळवण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या खेळाडूंना झगडावे लागत होते. तर सामन्याच्या शेवटी आक्रमण करताना मध्य रेल्वेच्या खेळाडूंनी कमालीचा खेळ उंचावत ७ खेळाडू जवळ जवळ तीन मिनिटे राखून बाद केले व मध्य रेल्वेने विजयाचा जल्लोष साजरा केला. या सामन्यात मध्य रेल्वेच्या रामजी कश्यप (२, १.१० मि. संरक्षण व ५ गुण), विजय हजारे (१.५०, २ मि. संरक्षण व १ गुण), संकेत कदम (१.३०, १.४० मि. संरक्षण), दिलीप खांडवी (१.३०, १.३० मि. संरक्षण व १ गुण) व अवधूत पाटील (नाबाद १.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी विजेतेपद खेचून आणताना दमदार खेळ केले व मध्य रेल्वेला विजयी केले. तर पराभूत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अरुण गुणकी (१.२०, १ मि. संरक्षण व २ गुण), निलेश (१.४० मि. संरक्षण व १ गुण), आदित्य गणपुले (१.१०, १.१० मि. संरक्षण) व स्वामी (१.१०, १.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी दिलेली कडवी लढत गत वर्षीचा इतिहास घडवण्यास अपुरी ठरली.
सामना संपल्यावर मध्य रेल्वेचे प्रशिक्षक सुधीर म्हस्के व संघ व्यवस्थापक योगेश मोरे यांनी समाधान व्यक्त करताना खेळाडूंनी विजयश्री खेचून आणल्याचे सांगितले.
तृतीय क्रमांकाच्या सामन्यात पश्चिम रेल्वेने दक्षिण मध्ये रेल्वेला हरवत तिसरा कमांक पटकावला. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक रामजी कश्यपला तर उत्कृष्ट आक्रमकाचे पारितोषिक रंजन शेट्टी व उत्कृष्ट संरक्षकाचे पारितोषिक अरुण गुणकीला देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ रेल्वे महाप्रबंधक मीनु इटियेरा यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी महाप्रबंधकांनी विजेत्या संघाचे व स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे अभिनंदन केले. या स्पर्धेत खेळलेले सर्व संघ हे रेल्वे परिवाराचे असून सर्वच संघांनी चंगल्या व उच्च दर्ज्याच्या खेळाचे प्रदर्शन केल्याचे सांगितले.
