अलिबागमध्ये महेंद्र दळवी तर बेलापूरमध्ये संदीप नाईक यांना देणार दमदार समर्थन

 

राज भंडारी
पनवेल : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू असतानाच नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यामध्ये मात्र सर्वच विधानसभा क्षेत्रात तिहेरी किंवा चौरंगी लढतीच्या तयारीत उमेदवार आहेत. यामध्ये आरपीआय १९५६ पक्षाचे कोकण विभाग अध्यक्ष जगदीश गायकवाड हे मात्र या सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या उमेदवारांना नक्कीच मदत करेन मात्र ज्या उमेदवारांना निवडून यायचे आहे त्या त्या उमेदवारांनी प्रथम माझ्याकडे जगदीश्वर मठात यावं, असं उमेदवारांना सूचित करताना त्यांनी भाजपच्यावतीने कशा पद्धतीने पनवेल महानगरपालिकेत भ्रष्टाचार करण्यात आला, दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाच्या विमानांच्या चाचण्या घेण्याचे भासवून किती भ्रष्टाचार केला जात आहे, यासह अनेक विषयांवर त्यांनी पनवेल – उरणमधील भाजपच्या नेत्यांवर आसूड उगवत आक्रमकता दाखविली. तसेच काही दिवसांपूर्वी जगदीश गायकवाड यांची उमेदवारी पक्षाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी पनवेलसाठी जाहीर केली होती. अर्ज दाखल करण्याची तारीख २९ असल्यामुळे २८ तारखेला यावर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आपल्या स्फोटक मुलाखतीमध्ये त्यांनी नवी मुंबई येथे राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप नाईक यांनी तुतारी हातात घेत उमेदवारी मिळविली आहे त्यांच्यासह अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगून इतर उमेदवारांनी जगदीश गायकवाड यांच्या घरातील जगदीश्वर मठात यावे, जो येऊन भेटेल तो निवडून येईल, असेही त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये मिश्कीलपणे सांगितले.
जगदीश गायकवाड पुढे म्हणाले, भविष्यात पनवेल महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त करावी लागेल. पनवेल महानगरपालिकेची ओळख भ्रष्टाचारी महापालिका म्हणून मलिन झाली आहे. पनवेल मधील सर्व कामे निकृष्ट दर्जाची आहेत. रस्त्यांच्या कामात तर प्रचंड भ्रष्टाचार आहे. केवळ ठराविक कंत्राटदारांनाच कामे दिली जातात. आगरी-कराडी समाजातील २८८  कंत्राटदार देशोधडीला लागले आहेत. घरातील दागदागिने विकण्याची त्यांच्यावर वेळ आली. तरीही पनवेल महानगरपालिकेकडून त्यांना कामे दिली जात नाहीत. पनवेल महानगरपालिकेतील कामे केवळ चार ठराविक कंत्राटदारांनाच दिली जातात. त्यामुळे ही चौकडी नष्ट करणारी ही निवडणूक असेल असे माझे ठाम मत आहे.
पनवेलकरांना मालमत्ता कराचा प्रश्न भेडसावत आहे. सत्तेत असतानाही टॅक्सच्या विरोधात मी स्वतः आवाज उठवला होता. नागरिकांना पाच वर्षे टॅक्स नको याबाबत मी व माजी नगरसेविका विद्याताई गायकवाड यांनीही ठाम भूमिका मांडली होती. चार महापालिकेंचे संदर्भ देऊन मालमत्ता कराला विरोध दर्शवला होता. त्यावेळी माझी एक व्हिडिओ क्लिप देखील चर्चेत आली होती. त्याचबरोबर टॅक्स भरणे का गरजेचे आहे याचे महत्त्व देखील पटवून दिले होते. मात्र त्याचे प्रमाण किती असावे  याबाबतही अभ्यासपूर्वक भूमिका  स्पष्ट केली होती. शहरी भागातील नागरिकांनी सिडकोला सेवा कर दिला आहे. त्यामुळे ग्रामीण भाग व शहरी भागातील नागरिकांनी किती कर द्यावा याबाबत बाजू उचलून धरली होती, असेही जगदीश गायकवाड म्हणाले.
कोविड काळानंतर नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. नोटबंदीचा जबरदस्त फटका सर्वांनाच बसला. राज्यात व देशात हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. ईडी सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भाजपविरोधात प्रचंड रोष आहे. भाजपच्या या जाचाला कंटाळून नवी मुंबईत संदीप नाईक यांनी देखील पक्ष सोडला. ते वैयक्तिकरित्या देखील आमदार होऊ शकतात. मात्र त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावण्याला भाजप जबाबदार असल्याचे मत जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केले.

पनवेलमधील लेडीज बारचा प्रश्न गहन असून सर्व लेडीज बार बंद झाले पाहिजेत. पनवेलमध्ये रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची संख्या लेडीज बारमुळेच बळावली आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकही त्रस्त आहेत. विधानभवनात लेडीज बारविरोधात अनेकदा आवाज उठवण्यात आला. मात्र आजपर्यंत पनवेलमधील लेडीज बार का बंद झाले नाहीत? बार चालकांना कोणाचा आशीर्वाद  आहे? या धंद्यात कोण पार्टनर आहे का?  असे विविध प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

यावेळी पनवेल – उरणच्या भाजप नेत्यांवर आसूड उगवताना जगदीश गायकवाड यांनी बोलताना सांगितले की, ज्या पद्धतीने विमानतळाला दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्यायला पाहिजे ते दिले गेले नाही तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून त्याचा सातत्याने उल्लेख हा पनवेल – उरणच्या आमदारांकडून केला जात आहे. आणि आता जनतेच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची वेळ आल्यानंतर विमानतळावर चाचण्या घेण्याची नौटंकी करून त्या माध्यमातून देखील पैसे लाटण्याचा जो प्रकार सुरू आहे तो जनतेच्याही लक्षात येतोय. विमानाची चाचणी घेण्यासाठी ७ लाख रुपयांचा खर्च आणि यांची ७० लाखांची बिले, हा भ्रष्टाचार सुद्धा बाहेर आलाच पाहिजे. यासाठी माझ्या दलित, मुस्लिम, आगरी, कोळी, कराडी यांच्यासह बारा बलुत जनतेने यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र केलं, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजासाठी सुरक्षित संविधान बनवून त्यांना त्यांचे हक्क दिले आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी दिवंगत दी.बा.पाटील साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह रक्तरंजित आहुती दिल्या, जेलमध्ये गेले, गोळीबार झेलले आणि आता दिबांच्या नावाचे राजकारण करून जनतेला वेडे बनविण्याचा धंदा या निवडणुकीत बंद झाला पाहिजे, असे जनतेला आवाहन करून त्यांनी भाजपच्या नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्याचबरोबर विमानतळाच्या आंदोलनामध्ये सर्वाधिक गुन्हे माझ्यावर दाखल झालेले असतानाही माझ्या नावाचा वापर न करता भाजपने श्रेय लाटण्याचा प्रकार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *