भांडुप: वीजबिलाचा भरणा टाळणाऱ्या ग्राहकांचे वीज मीटर काढून घेणाऱ्या महिला विद्युत सहायकास धक्काबुक्की व दमदाटी करण्याची संतापजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली. महावितरणच्या पनवेल शहर विभागांतर्गत पारगाव परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध पाच कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

शरद कृष्णा भोईर, अमृत भोईर (राहणार शिव मॅजेस्टिक बिल्डींग, पारगाव, करंजाडे), एक अनोळखी अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शिव मॅजेस्टिक बिल्डींगमधील जवळपास ९ ग्राहकांनी वीजबिल भरले नव्हते. त्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीजपुरवठा खंडित करुनही संबंधित ग्राहकांनी वीजबिल भरले नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार विद्युत सहायक धनश्री भारती संबंधित ग्राहकांचे मीटर काढून कार्यालयाकडे निघाल्या असतांना आरोपींनी त्यांना धक्काबुक्की व दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणला. विद्युत सहायक भारती यांच्या फिर्यादीवरून पनवेल शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. कर्तव्यावरील वीज कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असून वीज ग्राहकांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *