पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे दोन उमेदवार जाहीर
सामाजिक कामाची पार्श्वभूमी असलेल्या दुबळा, वळवी यांना उमेदवारी
योगेश चांदेकर
पालघरः विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर जिल्ह्यातून दोघांची नावे जाहीर केली आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र दुबळा यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली आहे, तर बोईसर विधानसभा मतदारसंघातूनही अपेक्षेप्रमाणे डॉ. विश्वास वळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोघेही सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असल्याने ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना आव्हान देतील, अशी चिन्हे आहेत.
महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातून अनेक उमेदवारांच्या नावाची चर्चा होती. बारा उमेदवार निवडणुकीच्या शर्यतीत होते; परंतु महाविकास आघाडीने पालघर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडला असून या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महायुतीच्या उमेदवारासोबत थेट लढत
राष्ट्रवादी काँग्रेसचे डहाणू तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी उमेदवारीच्या स्पर्धेत होते; परंतु हा मतदारसंघच शिवसेनेच्या ठाकरे गटाला गेल्यामुळे चौधरी यांची उमेदवारी आपोआप निकालात निघाली आहे. ॲड. चौधरी यांनी पूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी महाविकास आघाडी जो उमेदवार देईल, त्या उमेदवाराचे काम करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना अशा तीन पक्षांनी दुबळा यांच्या विजयासाठी सामूहिक पद्धतीने प्रयत्न करण्यावर भर दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पालघर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या डॉ. हेमंत सवरा यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्यापेक्षा तीस हजार मते जास्त मिळाली होती. या पार्श्वभूमीवर आता दुबळा हे महायुतीचा उमेदवार जो ठरेल यांच्याशी कशी लढत देतात, हे पाहावे लागेल.
प्रस्थापित विरुद्ध विस्थापित
पालघर हा मतदारसंघ भाजपने स्वतःला मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले असून माजी खासदार राजेंद्र गावित यांचे तेथे पुनर्वसन करण्याचे घाटत होते; परंतु महायुतीतील तीन पक्षांच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार विद्यमान आमदार असलेली जागा त्याच पक्षाकडे ठेवण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीकडून नेमका उमेदवार कोण हे अजून गुलदस्त्यात आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात जयेंद्र दुबळा यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. सामाजिकतेचा वसा घेऊन त्यांनी अनेक कामे केली. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यात डहाणू तालुक्यात झालेले प्रचंड नुकसान अशावेळी दुबळा हे त्यांच्या मदतीला धावून आले. तसेच एखादा शब्द देणे सोपे असते; परंतु दिलेला शब्द पाळणे हे आव्हानात्मक असते, हे आव्हान त्यांनी पेलले. त्यासाठी अनेक आव्हानांवर त्यांना मात करावी लागली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादळात नुकसान झालेल्यांना मदत करण्याचे आश्वासन अनेकांनी दिले होते; परंतु वाणगाव परिसरातील नुकसानीच्या वेळी दुबळा हेच धावून आले होते आणि अनेक नागरिकांना त्यांनी आर्थिक मदत केली. आचारसंहितेच्या काळात अटी शिथिल करून नुकसानग्रस्तांना मदत करण्यात यावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
‘विश्वास’चा अनेकांना आधार
शिवसेनेच्या शिंदे गटातून गेल्या काही दिवसापूर्वी डॉ. विश्वास वळवी यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. राजकारणातून समाजकारण करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वावर डॉ. वळवी यांचा विश्वास असून त्यांनी त्यांच्या ‘विश्वास फाउंडेशन’च्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील गाव, पाड्यात मोठे सामाजिक काम केले आहे. जिल्ह्याच्या सामाजिक कार्यात ते कायम अग्रेसर असतात. नवरात्रोत्सव सुरू करण्यात त्यांचा मोठा पुढाकार असतो. ‘विश्वास फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब जनतेची मोठी सेवा केली आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या सेवाकार्याचा मोठा लाभ शहरी व ग्रामीण आदिवासी बांधवांना झाला होता. वंचित घटक, आदिवासी आणि विद्यार्थी यांच्यासाठी विश्वास फाउंडेशन मोठा आधार ठरले आहे.
दहा वर्षांनंतर उमेदवारी
गेल्या दहा वर्षांपासून डॉ. वळवी हे बोईसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करीत होते; परंतु प्रत्येक वेळी अन्य कोणाला तरी उमेदवारी मिळत असल्याने त्यांना थांबावे लागत होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या पालघर, बोईसर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीला कामडी बॅकफुटवर गेल्याने विधानसभा मतदारसंघात आर्थिकदृष्ट्या मजबूत उमेदवार देण्याची तयारी ठाकरे यांनी केली होती. कामडी यांना ३२ हजार मते कमी होती.
डॉ. वळवी यांच्या रूपाने आता चांगल्या उमेदवाराचा शोध संपला आहे. दुबळा आणि डॉ. वळवी या दोघांनाही सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असल्याने तसेच ते सातत्याने रस्त्यावर संघर्ष करीत असल्याने त्यांच्या उमेदवारीचा विचार ठाकरे यांनी केला. बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असले, तर पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. या वेळी पालघर जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात तिरंगी-चौरंगी लढती होण्याची शक्यता असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे हे दोन उमेदवार निवडणुकीला कसे सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.