डहाणू उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात उत्पादन शुल्क विभाग सतर्क
योगेश चांदेकर
पालघरः विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि साठा यावर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून पालघर परिसरात केलेल्या कारवाईत विदेशी मद्याचे
८० बॉक्स आणि मद्य वाहतुकीसाठी वापरलेली महिंद्रा पिकअप जीप असा एकूण १५ लाख ४३ हजार ७२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाने याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
पालघर जिल्ह्यातील काही तालुके दीव-दमण, दादरा-नगर हवेली आणि गुजरातला लागून असल्यामुळे आंतरराज्य सीमेवरून या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दमण बनावटीची दारू, अवैद्य मद्य महाराष्ट्रात येत असते. या भागात मोठ्या प्रमाणात मद्याची तस्करी होत असून गुजरातमधून येणारे मद्य महाराष्ट्रातील विविध भागात पालघर जिल्ह्यातून जात असते.
चोरट्या वाहतुकीवर लक्ष
निवडणुकीच्या काळात मद्याचा चोरटा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असल्याने राज्य उत्पादन शुल्क डहाणू विभागाने अशा मद्याची वाहतूक, साठा आणि विक्री यावर गेल्या काही दिवसांपासून लक्ष ठेवले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू विभागाने केलेल्या कारवाईत तलासरी तालुक्यातील उधवा येथे अवैध मद्य वाहतूक करणारी पिकअप (क्रमांक एम एच ४८ सी क्यू २७१६) जात असताना ती अडवून तपासणी केली असता त्यात अवैध विदेशी मद्याचे ८० बॉक्स आढळून आले. हे सर्व मद्य दादरा नगर हवेली येथून विक्रीसाठी महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आले. दरम्यान याप्रकरणी बोईसर येथील रामबहाद्दूर यादव याला अटक करण्यात आली आहे.
कारवाईत यांचा सहभाग
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख, पालघर विभागाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक राजेश शिंदे, विश्वजीत आभाळे, विकास आबनावे, सहायक दुय्यम निरीक्षक ए. एम. शेख, कमलेश पेंदाम, अमोल नलावडे, शशिकांत पाटील आदींनी ही कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, कोकण विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, पालघर विभागाचे उपाध्यक्ष बी. एन. भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कोट
‘निवडणुकीच्या काळातील मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग गेल्या काही दिवसांपासून डोळ्यात तेल घालून काम करत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातील अशा प्रकारच्या मद्य वाहतुकीवर आमची करडी नजर असून १५ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई यापुढेही चालूच राहील.
-सुनील देशमुख, निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, डहाणू